कॅप्टनकूल, थाला, माही अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा एमएस धोनी याचा काल (०७ जुलै) ४० वा वाढदिवस होता. महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या धोनीने नेहमीप्रमाणे आपल्या वाढदिवशीही सोशल मीडियापासून अंतर बनवून ठेवले. तो यंदा आपला वाढदिवस कशाप्रकारे साजरा करेल? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर त्याच्या वाढदिवसाचे फोटो पुढे आले आहेत. धोनी किंवा त्याची पत्नी साक्षी यांनी नव्हे तर त्याच्या जवळच्या मित्रांनी हे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
माजी भारतीय कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनीने आपल्या राहत्या घरी रांचीमध्ये आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी तो कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत रांचीच्या फार्महाऊसमध्ये चिल करताना दिसला. धोनीचा मित्र हितेश सांघवी याने इंस्टाग्रामवर धोनीसोबतचे फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. या फोटोत धोनी पांढरी दाढी आणि मोठ्या मिशांमध्ये अगदी राजबिंडा असल्यासारखे दिसत आहे.
यापुर्वी धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसला होता. तेव्हा धोनीचा हा नवा लूक पुढे आला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर धोनी केवळ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना दिसतो. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने अप्रतिम प्रदर्शन केले होते. पहिला सामना गमावल्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे. ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकत त्यांनी चौथे जेतेपद जिंकण्याची तयारी दाखवली आहे.
कोविड-१९ मुळे आयपीएळ २०२१चा हंगाम अर्ध्यातच स्थगित करण्यात आला होता. मात्र लवकरच संयुक्त अरब अमिरातीमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान राहिलेले आयपीएल सामने खेळवले जाणार आहे. धोनी आणि त्याचा चेन्नई संघ आपली लय कायम राखत प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी झगडताना दिसेल.