भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. एक प्रतिभावान गोलंदाज म्हणून अशोक दिंडाची ओळख होती. त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अशोक दिंडाने भारताकडून १३ एकदिवसीय सामने आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने अनुक्रमे १२ आणि १७ बळी टिपले आहेत.
https://twitter.com/srinjoysanyal07/status/1356587326244220929?s=20
अशोक दिंडाने सन डिसेंबर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे भारताकडून टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच सामन्यात त्याने तीन षटकांत 34 धावा देत एक विकेट घेतली होती. सनथ जयसूर्याची त्याने घेतलेली विकेट ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट होती.
अशोक दिंडाने भारतासाठी अखेरचा सामना इंग्लंड विरुद्ध खेळला होता. जानेवारी २०१३ मध्ये झालेला तो एकदिवसीय सामना त्याचा अखेरचा सामना होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू न शकलेल्या अशोक दिंडाची स्थानिक स्तरावरील क्रिकेट कारकिर्द मात्र चांगली राहिली आहे.
अशोक दिंडाने बंगालकडून आपले प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्याने ११६ प्रथम श्रेणी सामन्यात २८.२८ च्या सरासरीने ४२० बळी घेतले आहेत. १२३ धावांत ८ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २६ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तर ५ वेळा सामन्यात १० बळी घेण्याची कामगिरी त्याच्या नावे आहे.





