इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या १६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने-सामने होते. राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करून दिलेल्या १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एकही विकेट सहजरित्या पूर्ण केले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांच्यात सलामीला नाबाद १८१ धावांची भागीदारी झाली होती. पडीक्कलने या सामन्यात १०१ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अशातच माजी भारतीय कर्णधाराने देखील त्याचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे.
देवदत्त पडीक्कलला कोविड-१९ मधून सावरत असल्याने आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिला सामना खेळायची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर पुढील २ सामन्यांमध्ये खेळताना तो लवकर बाद झाला होता. पण यानंतर राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळीसह जोरदार पुनरागमन केले.
या शतकी खेळीनंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी म्हटले की, “या गोष्टीने आश्चर्य वाटणार नाही की, तो लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसेल. कारण त्याच्याकडे ते कौशल्य आणि ती क्षमता आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी क्रिकेटमध्ये त्याने भरपूर धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने मोठी शतकं देखील झळकावले आहेत. ५० षटकांच्या सामन्यात तो भरपूर धावा करतो आणि शतक देखील झळकावतो. देशांतर्गत होणाऱ्या टी२० सामन्यांमध्ये देखील त्याने भरपूर धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला जर भारतीय संघात संधी मिळाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने,आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. यासोबतच या संघातील फलंदाज आणि गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत. ८ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ, गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. गुरुवारी(२२ एप्रिल ) झालेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाचा १० गडी राखून दारुण पराभव केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर, पुढील आव्हान चेन्नई सुपर किंग्ज संघाचे असणार आहे. या सामन्यात देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ विजय संपादन करून आपला विजयी मोर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ






