भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडले आहेत. आजच्या तरुणांना सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली अशा नजिकच्या काळातील क्रिकेटपटूंविषयी माहिती आहे. मात्र, या महान क्रिकेटपटूंच्या यादीत जर पहिले नाव कोणाचे लिहिले गेले असेल, तर ते आहे विजय मर्चंट यांचे. ते भारत स्वतंत्र होणापूर्वीचे भारतीय क्रिकेटमधील सर्वाता दिग्गज फलंदाज होते. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्यांनी जगात नाव केले होते आणि भारतीय संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आज (१२ ऑक्टोबर) या महान फलंदाजाची जयंती आहे.
विजय मर्चंट यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९११ साली मुंबई (त्यावेळी बंबई) मध्ये झाला होता. विजय यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव विजय माधव ठाकरसी असे होते. मात्र, त्यांनी शाळेत त्यांचे नाव मर्चंट असे सांगितले होते. तेव्हापासून त्यांना विजय मर्चंट या नावानेच सर्व ओळखतात. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबईतून केली होती. मुंबईसाठी त्यांनी चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केल्यानंतर त्यांना भारतीय संघात सामील केले गेले. १९३३ साली भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरोधात त्यांना भारतीय संघात सामील केले गेले होते. हा सामना भारतात खेळला गेलेला पहिला कसोटी सामना ठरला होता. मात्र, ते या सामन्यात खेळू शकले नाही.
१८ वर्षांच्या कारकिर्दीत खेळले १० कसोटी सामने
विजय यांची कसोटी कारकीर्द १८ वर्षांपर्यंत चालली, पण त्यांनी या काळात केवळ १० कसोटी सामने खेळले. याचे प्रमुख कारण ठरले दुसरे महायुद्ध. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तीन वर्षांमध्ये त्यांनी केवळ तीन कसोटी सामने खेळले. त्या काळात भारतीय संघ आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हता. विजय यांनी १९३६ साली मॅंचेस्टरमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक केले होते. या सामन्यात विजय यांनी भारताच्या दुसऱ्या डावात ११४ धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यांनी या सामन्यात मुश्ताक अली यांच्यासोबत २०३ धावांची भागीदारी केलेली.
महायुद्धानंतर विजय यांच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची संधी होती. पण खराब आरोग्याच्या कारणास्तव त्यांना या दौऱ्यावर जाता आले नाही. ते ऑस्ट्रेलियामध्ये न गेल्यामुळे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमॅन म्हणाले होते की, माझ्या संघाचे नशीब चांगले नव्हते. कारण, विजय मर्चंट यांच्या रूपात सर्वश्रेष्ठ भारतीय फलंदाजाला खेळताना पाहण्याची संधी मिळाली नाही.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ब्रॅडमन, ६९ डावांमध्ये ११ शतक
विजय मर्चंट हे खऱ्या अर्धाना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज होते. त्यांचे रणजी ट्रॉफीतील आकडे सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यांनी रणजीमध्ये ९८.७५ च्या सरासरीने ३६३९ धावा केल्या आहेत. याच कारणास्तव त्यांना भारतीय क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमॅन म्हटले जाते. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर (९५.१४) विजय (७१.६४) यांची सरासरी सर्वाधिक आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारे सर्वात वयस्कर खेळाडू
तसेच विजय यांच्या नावावर एक खास विक्रमही आहे जो आजपर्यंत अबाधित राहिला आहे. त्यांच्या नावावर सर्वात वयस्कर खेळाडूने केलेल्या कसोटी शतकाचाही विक्रम आहे. त्यांनी १९५१ मध्ये हा विक्रम इंग्लंविरुद्ध खेळताना केला होता.
विजयने त्यांच्या १८ वर्षाच्या कसोटी क्रिकेटमधील कारर्किर्दीत १० सामने खेळले. हे सर्व सामने इंग्लंडमध्ये पार पडले. या सामन्यांतील १८ डावांमध्ये त्यांनी ८५९ धावा केल्या. ज्यामध्ये ३ अर्धशतक आणि ३ शतके सामील आहेत. या सामन्यांमध्ये त्यांची सरासरी ४७.७२ ची होती. याव्यतिरिक्त १५० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी १३४७० धावा केल्या. ज्यामध्ये ४५ शतकांचा आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी एका हॅट्रिकसह ६५ विकेट्स घेतल्या आहेत. २७ ऑक्टोबर १९८७ साली वयाच्या ७६ व्या वर्षी त्याचे निधन धाले. यानंतर त्याच्या क्रिकेटमधील योगदानाच्या आठवणीत बीसीसीआयने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी खेळवण्यास सुरुवात केली.






