इंग्लंड विरूद्ध एका कसोटी सामन्यात सलग 21 निर्धाव षटके टाकून विक्रम करणारे भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी (17 जानेवारी) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या निधानाबद्दल माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने दुःख व्यक्त केेले आहे.
सचिनने ट्वीट केले, ‘श्री बापू नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. मी कसोटीमध्ये त्याच्या सलग 21 निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम ऐकून मोठा झालो आहे. त्याच्या कुटूबांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या दु:खात मी सहभागी आहे.’
नाडकर्णी यांनी 1955ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तर त्यांनी शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्धच 1968 मध्ये खेळला होता.
नाडकर्णी यांनी 1964 मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग 21 षटके निर्धाव षटक टाकले होते. त्यावेळेस त्यांनी एकूण 32 षटकांमध्ये 27 षटके निर्धाव टाकत फक्त 5 धावा दिल्या होत्या. यातील सलग 21 षटके निर्धाव होती.
त्यांनी भारतासाठी 41 कसोटी सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी 1414 धावा केल्या आहेत तर 88 विकेट देखील घेतल्या आहेत. त्यांनी मुंबईसाठी 191 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 500 विकेट्स घेतल्या आहेत. तर 8880 धावा देखील केल्या आहेत.





