भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कर्नाटकचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांची केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना अवघ्या महिन्याभरापूर्वीच संघाचं मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना पदावरून हटवण्यात आलंय. त्यांचा करार एक वर्षासाठी होता, परंतु नेशन आफ्रिकेच्या अहवालानुसार डोडा गणेश यांची नियुक्ती योग्य पद्धतीनं झाली नव्हती. त्यात अनियमितता होती. याच कारणांमुळे त्यांना आता मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आलंय.
क्रिकेट केनियानं एक पत्र देऊन दोडा गणेश यांना प्रशिक्षकपदावरून हटवलं. या पत्रात लिहिलं आहे की, क्रिकेट केनियाच्या कार्यकारी मंडळानं बुधवार 28 ऑगस्ट 2024 रोजी एक ठराव पारित केला. या अंतर्गत, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कार्यकारी मंडळानं तुमची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती नाकारली आहे. तुम्ही आणि मनोज पटेल यांच्यात 7 ऑगस्ट 2024 रोजी झालेला करार अवैध होता. या करारानुसार क्रिकेट केनिया आता जबाबदार नाही. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रीय संघाशी संपर्क साधणं किंवा त्यांच्याशी व्यवहार करणं तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
डोडा गणेश यांचा करार रद्द झाल्यानंतर आता केनिया संघात दोन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू लॅमेक ओन्यांगो आणि जोसेफ अंगारा यांची मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांची पहिली जबाबदारी केनिया संघाला आयसीसी डिव्हिजन 2 चॅलेंज लीगसाठी तयार करणं असेल. केनिया येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये पापुआ न्यू गिनी, कतार, डेन्मार्क आणि जर्सी हे संघ सहभागी होतील.
यानंतर 2026 आयसीसी टी20 विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता बी स्पर्धा खेळली जाईल. केनियाशिवाय झिम्बाब्वे, रवांडा, मोझांबिक, चिली आणि झांबिया हे देश या स्पर्धेत खेळणार आहेत. ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
डोडा गणेश यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी चांगली नव्हती. ते भारतासाठी फक्त 4 कसोटी आणि एक वनडे सामना खेळले. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची आकडेवारी उत्कृष्ट होती.
हेही वाचा –
नीरज चोप्रा आज पुन्हा ॲक्शनमध्ये! भालाफेकीचा अंतिम सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
सरफराज खानचा खराब फॉर्म चिंतेचा विषय, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पत्ता कट होणार?
दणका! 17 षटकार 5 चाैकार, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची झंझावाती शतकी खेळी