दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये काल खेळवल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने दणदणीत विजय मिळविला. कोलकाताने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीने अवघ्या १६.३ षटकांतच गाठले. यात सलामीवीर पृथ्वी शॉच्या अर्धशतकाचा मोलाचा वाटा होता.
सलामीला आलेल्या पृथ्वीने कोलकात्याच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी केली. त्याने ४१ चेंडूत ८२ धावांची आक्रमक खेळी करत दिल्लीचा विजय सुनिश्चित केला. त्याची ही अप्रतिम खेळी पाहून भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग प्रभावित झाला आहे. त्याने शॉची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
“मी देखील प्रयत्न केला होता, पण मलाही जमले नाही”
पृथ्वी शॉने कालच्या खेळीत डावाच्या पहिल्याच षटकांत ६ चौकार मारत धडाकेबाज सुरुवात केली होती. त्याने कोलकात्याचा गोलंदाज शिवम मावीला पहिल्याच षटकांत स्थिरावण्याची संधीही न देता लागोपाठ सहा चौकार मारले. असा कारनामा करणारा तो आयपीएल मधील केवळ दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीने सेहवाग चांगलाच प्रभावित झाला होता.
शॉचे या कामगिरी बद्दल कौतुक करतांना सेहवाग म्हणाला, “सहा चेंडूत सहा चौकार मारणे, म्हणजे सहाही चेंडू गॅप मध्ये टोलवणे. जे अजिबात सोपे नाही. मी देखील माझ्या कारकिर्दीत सलामीला फलंदाजी केली आहे आणि मी देखील सहाही चेंडू सीमापार पाठवण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. पण मी फार फार तर एका षटकात १८ किंवा २० धावा वसूल करण्यात यशस्वी झालो. मात्र एकाच षटकांत ६ षटकार किंवा ६ चौकार मारणे, मला कधीच जमले नाही. हे साध्य करण्यासाठीचे तुमचे टायमिंग अतिशय अचूक असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही गॅप मध्ये चेंडू मारून चौकार वसूल करू शकता.”
शॉच्या कालच्या खेळीबद्दल बोलतांना सेहवाग म्हणाला, “पृथ्वी शॉने काल अप्रतिम फलंदाजी केली. त्याने अतिशय उच्च दर्जाचा खेळ केला. बहुतेक शिवम मावीसह १९ वर्षांखालील संघात खेळल्याच्या अनुभवाचा त्याला फायदा झाला. अर्थात मी देखील आशिष नेहराला नेटमध्ये अनेकदा खेळलो आहे. पण म्हणून प्रत्यक्ष सामन्यात त्याला ६ चौकार मारणे मला शक्य झाले नाही. त्यामुळे शॉने केलेली कामगिरी अनन्यसाधारण आहे.” अशा शब्दांत सेहवागने पृथ्वी शॉची पाठ थोपटली आहे.
महत्वाच्या बातम्या:
शर्माजी झाले ३४ वर्षांचे! शुभेच्छांचा होतोय वर्षाव, पाहा काही खास पोस्ट
अशी ५ कारणं, ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार