भारतीय क्रिकेट संघाची दुसरी तुकडी येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघावर आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंचा पूर्ण विश्वास आहे. अनेकांनी भारतीय संघालाच पाठिंबा दर्शवत श्रीलंका दौऱ्यावरील विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून निवडले आहे.
भारतीय संघाचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनीही भारतीय संघाने श्रीलंकाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत विजय नोंदवल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे सांगितले आहे. यामागचे मुख्य कारण सूर्यकुमार यादव, इशान किशन यांसारखे प्रतिभाशाली युवा खेळाडू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी आपले विचार मांडले आहेत. ते म्हणाले की, “सूर्यकुमार आणि इशान यांसारख्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील तज्ञ खेळाडूंचा श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात समावेश आहे. त्यांच्यामध्ये आवश्यक ती शैली आहे, ज्यामुळे भारतीय संघ मजबूत अशा श्रीलंकेलाही मात देण्यास सक्षम आहे.”
“युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या शैलीचा स्तर समान आहे, जो आमच्या वेळीही असाच होता. परंतु आजच्या मुलांमधील विश्वासाची पातळी आमच्या युगातील क्रिकेटपटूंपेक्षा ५ पटीने जास्त आहे. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास, सूर्यकुमारला टी२० आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांच्या गोलंदाजीवर षटकार मारले. इशाननेही पदार्पणातच विरोधी संघाच्या खेळाडूंना धू धू धुतले. त्यामुळे हे युवा धुरंधर श्रीलंकेत मालिका जिंकले तर मला अजिबात नवल वाटणार नाही,” असे ते पुढे म्हणाले.
या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
४६ वर्षीय प्रसाद यांनी श्रीलंकाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत सर्वांचे लक्ष असणाऱ्या काही खेळाडूंची निवड केली. याबरोबरच वेगवान गोलंदाज आवेश खान या मालिकांचा भाग नसल्याने खंतही व्यक्त केली आहे. कारण आवेश कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघाचा राखीव खेळाडू आहे.
“सूर्यकुमार तो व्यक्ती आहे, ज्याच्यावर सर्वांच्याच नजरा लागून असतील. इशान आणि संजू सॅमसनकडेही स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असेल. मला आवेश खानलाही खेळताना पाहायला आवडले असते. कारण त्याने आयपीएलमध्ये खूप चांगले प्रदर्शन केले होते. परंतु दुर्भाग्याने तो या दोन्ही मालिकांमध्ये खेळू शकणार नसल्याने मी थोडा नाराज आहे,” असे ते शेवटी म्हणाले.
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा १३ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळवली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC स्पर्धेत ‘हे’ २ महत्वाचे बदल करण्याची गरज; भारतीय दिग्गजाची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ मागणी
अनुभवी यष्टीरक्षकाचे बडेबोल; कारण सांगत म्हणाला, ‘जगभरातील संघ रिषभच्या नावालाही घाबरत आहेत’
भारताकडून ३४९ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचा गोलंदाजीबाबतचा ‘हा’ सल्ला विराटसेना लावणार मार्गी!






