पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने अनुभवी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज-यष्टिरक्षक अनिकेत पोरवाल यांना दुसऱ्या पर्वासाठी आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवली आहे. पुनित बालन ग्रुपच्या मालकीच्या संघाने पुण्यात झालेल्या लिलावात २० सदस्यीय संघात नऊ खेळाडूंचा समावेश करण्यासाठी एकूण १०.९० लाख रुपये खर्च केले आणि त्यांची लिलावाची रणनीती यशस्वीपणे पार पाडताना गोलंदाजीमध्ये काही वैविध्यही आणले.
भारताचा माजी फलंदाज केदार जाधवच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर टस्कर्सने गेल्या आवृत्तीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते. या वर्षी जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून लिलावामधून संघात मूल्य वाढवणाऱ्या काही स्टार खेळाडूंची निवड करण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्धार होता.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दबावाखाली ९६ धावांची खेळी करून भारताला फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या सचिन धस याच्यासह महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या मागील आवृत्तीतील सर्वाधिक धावा करणाऱ्या अंकित बावणे यांना संघात कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवले.“एकंदरीत एक मजबूत संघ निवडण्याचा आम्हाला आनंद होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला संगम असल्याने, लाइन-अप विलक्षण दिसते.
प्रत्येक खेळाडू संघात त्यांची स्वतःची अद्वितीय कौशल्ये आणि सामर्थ्य आणतो. मला विश्वास आहे की हा संघ आगामी हंगामात आम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि कोल्हापूर टस्कर्सच्या चाहत्यांचे व समर्थकांचे मनोरंजन करेल,” असा विश्वास पुनिल बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी व्यक्त केला.लिलावात कोल्हापूर टस्कर्सने ४० हजार रुपयांची मूळ किंमत असलेल्या बिग हिटिंग बॅट्समन पोरवालसाठी ४.५० लाखांची यशस्वी बोली लावली. अनुभवी अष्टपैलू मुंढे ( मूळ किंमत ६०,०००) याला ३ लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले.
३५ वर्षीय मुंडे हा इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन संघांचा सदस्य होता. त्याने २०११ मध्ये पुणे वॉरियर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.१९ वर्षांखालील स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोरवालने दोन अर्धशतके झळकावली आणि १८० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करून या वर्षी मार्चमध्ये कारभारी प्रीमियर लीग २०२४ मध्ये त्याच्या संघाला विजय मिळवून दिला.
संघाने अष्टपैलू यश खलाडकरला २० हजार रुपयांच्या मूळ किमतीच्या तुलनेत २.७ लाख रुपयांना खरेदी केले. कोल्हापूर टस्कर्सने लिलावात विकत घेतलेल्या इतर खेळाडूंमध्ये हर्ष संघवी ( २० हजार ), हर्षल मिश्रा ( ४० हजार ), योगेश डोंगरे ( ३० हजार), हृषिकेश दौंड ( २० हजार ) आणि सुमित मरकली ( २० हजार ) यांचा समावेश आहे.
कोल्हापूर टस्कर्सचा संघ – केदार जाधव, अंकित बावणे, सचिन धस, हर्ष संघवी, कीर्तिराज वाडेकर, अनिकेत पोरवाल, हृषीकेश दौंड (१९ वर्षांखालील), योगेश डोंगरे, तरनजीत सिंग, आत्मा पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, यश खळदकर, निहाल तुसामद, मनोज यादव, डॉ. उमर शहा, हर्षल मिश्रा ( १९ वर्षांखालील ), सुमित मरकली, सिद्धार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे.