पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू मोहमंद युसूफ हा भारताचा कर्णधार विराट कोहलीला सचिन, द्रविड किंवा लक्ष्मण या दिग्गजांच्या यादीत सामील करण्यास नकार देतो.
मोहम्मद युसूफ म्हणतो, ” आजच क्रिकेट आणि आम्ही खेळायचो त्या क्रिकेटमध्ये प्रचंड फरक आहे. आजच्या क्रिकेटची गुणवत्ता आम्ही क्रिकेट खेळायचो त्याप्रमाणे नाही. विराट एक चांगला खेळाडू आहे आणि मी त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत असतो. परंतु माझ्या मताप्रमाणे तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या वर्गात येत नाही. ”
जीवो सुपर चॅनेलशी बोलताना मोहम्मद युसूफ पुढे म्हणतो, “कुणाला मेनी नसेल परंतु आजकाल पाहिल्यासारखे दिग्गज फलंदाज आणि गोलंदाज राहिले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं तर शेन वॉर्न किंवा ग्लेन मॅकग्राची बरोबरी करेल असा एकही गोलंदाज आता संघात नाही. भारताकडे आता कुंबळे, श्रीनाथ सारखे दिग्गज नाही, अन्य संघाचीही तीच अवस्था आहे. ”
या दिग्गज खेळाडूने पाकिस्तानकडून १९९८ ते २०१० या काळात ९० कसोटी आणि २८८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३९ शतकांसह एकूण १७,२५० धावा केल्या आहेत.
सचिन किंवा द्रविडला वेगळ्या वर्गातील म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी वेगळ्या गोलंदाज किंवा खेळपट्टीवर केलेल्या धावा आहेत असाही मोहम्मद युसूफ पुढे म्हणतो.
“एकवेळ वासिम अक्रम, वकार युनूस शोएब अख्तर किंवा साकलेन मुश्ताक यांच्या विरुद्ध धावा करणे हे नक्कीच अवघड गोष्ट होती, मला सचिन आणि द्रविड कायम परिपूर्ण खेळाडू वाटायचे आणि त्यांनी काळाप्रमाणे खेळात सुधारणा केल्या. मी त्यांच्याकडून बरेच शिकलो. ”
“मी असं नक्कीच म्हणत नाही की विराट एक चांगला खेळाडू नाही परंतु काळ नक्की बदलला आहे. ” आपल्या कोहलीबद्दलच्या असलेल मत असं का आहे हे मोहम्मद युसूफने स्पष्ट केले.