पुणे । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणुक २७मे रोजी होत असुन यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणुक लढवणार आहेत.
परंतु महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याकडे एकाच कोणत्या तरी खेळाच्या संघटनेचे पद असणे बंधणकारक असल्यामुळे अजित पवार खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असे बोलले जात आहे. गेले काही दिवस त्यांनी पुणे तसेच राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले आहे.
२०१४ ते २०१८ या काळात त्यांनी खो-खोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.
२०१३ मध्ये त्यांच्याकडे कबड्डी आणि खो-खो अशी दोन्ही संघटनांची पदे असल्यामुळे नियमानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच या काळात ते महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षही राहिले आहेत.
२०१३मध्ये कबड्डी असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिलला झाली होती. तेव्हा कार्यकारिणीतील १४ प्रमुख पदांसाठी ३७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले.
माजी केंद्रियमंत्री शरद पवार आणि नंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियमितपणे सहभाग असलेली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची २०१३ची निवडणूक प्रथमच त्यांच्या थेट सहभागाशिवाय झाली होती. सध्या शरद पवार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आजीव अध्यक्ष असुन अजित पवार हे प्रमुख आश्रयदाते आहेत
आज जिल्हानिहाय मतदारांची नावे स्वीकारण्याची मुदत संपत असुन पुणे जिल्हा कबड्डी संघटनेकडून अजूनही तिसऱ्या नावाची घोषणा करण्यात आली नाही.
पुणे ग्रामीणमधून अजित पवार तर पिंपरी चिंचवडमधून आमदार महेश लांडगे यांची नावे आधीच निश्चित झाली आहेत. तिसऱ्या नावासाठी ७मे रोजी संघटनेच्या मुख्यालयात मतदान घेण्यात आले आहे. त्याचा निकाल आज घोषीत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीतील १४ प्रमुख पदे अशी-
अध्यक्ष
कार्याध्यक्ष
उपाध्यक्ष (५ पदे)
सर कार्यवाह
खजिनदार
सहकार्यवाह (५ पदे )
२०१८ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीचा असा आहे कार्यक्रम-
११ मे- जिल्हानिहाय मतदारांची यादी जाहीर
१२ ते १५ मे- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख
१६ मे – उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन वैध उमेद्वारांच्या नावाची घोषणा
१७ अाणि १८ मे- अर्ज माघारी घेण्याची तारीख
२७ मे – सकाळी मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर
संबंधित वृत्त-
– पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनमधून राज्य संघटनेवर कोण तिघे जाणार?
–महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक २७ मे रोजी
–वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डीमध्ये जय ब्राह्मणदेवची जोरदार सलामी
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध