भारतीय संघाचे मोठ्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीमध्ये प्रदर्शन चांगले झाले नाही. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाकडून 8 विकेटने पराभव झाला आहे. भारतीय संघाने 2013 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची कोणतीही स्पर्धा जिंकलेली नाही. या संदर्भात वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांनी भारतीय संघाला सल्ला दिला आहे. भारतीय संघाला त्यांच्या खेळामध्ये बदल करण्याची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भारतीय संघाला 2013 पासून आयसीसीच्या स्पर्धेमध्ये 3 अंतिम आणि 3 उपांत्यफेरीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाच्या या आयसीसीचे स्पर्धेमध्ये सतत होणाऱ्या पराभवावर कर्टली एम्ब्रोस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘कर्टली व करिष्मा’ या कार्यक्रमादरम्यान वेस्टइंडीजच्या या दिग्गज खेळाडूने आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले की, “भारतीय संघाने आयसीसीच्या स्पर्धेमधील मोठ्या सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. ज्यामध्ये अंतिम सामना आणि उपांत्यफेरी यांचा समावेश होता. मला या गोष्टीची खूप चिंता वाटते कारण भारतीय संघ सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे.”
अंतिम आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये खेळ बदलण्याची गरज नाही
कर्टली म्हणाले की, “जेव्हा जेव्हा मोठ्या प्रसंगी चांगली खेळण्याची वेळ येते. तेव्हा भारतीय संघ सतत अपयशी ठरतो. मला वाटते की भारतीय संघ अंतिम आणि उपांत्य फेरीमध्ये येऊन आपला गेमप्लॅन बदलतो. त्यामुळे त्यांच्यावर अधिक दबाव पडतो. भारतीय संघाच्या सतत पराभवामागचे जर हेच कारण असेल तर ते चुकीचे आहे. माजी खेळाडू म्हणून मी एवढेच सांगू शकतो की, जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही जसे आहात तसाच तुमचा खेळ राहू द्यात.”
ते म्हणाले की, “तुम्ही ज्याप्रकारे खेळता त्याचप्रकारे खेळा. आपल्या उणीवामध्ये सुधारणा करा. तुम्ही तुमचा गेमप्लॅन आहे तसेच खेळू शकता. मग तो अंतिम सामना असो किंवा उपांत्य फेरी असो. आपला खेळ फक्त सुरुवातीपासून जसा आहे तसाच ठेवा. मग तुम्हाला यश नक्की मिळेल.”
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 3 आयसीसी ट्रॉफीमध्ये पराभूत
विराट कोहलीने भारतीय संघासाठी 201 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषविले आहे. परंतु अजूनही विराटने आपल्या नेतृत्वाखाली एकही आयसीसीची ट्रॉफी मिळविली नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अगोदर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्कारला. तर 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब मिळविला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडमध्ये जिंकायचे असेल, तर ‘या’ कर्णधाराकडून घ्यावा ‘गुरुमंत्र’; धोनी-कोहली दोघेही ठरलेत फ्लॉप!
नव्या फ्रँचायझींच्या येण्याने बीसीसीआयवर होणार ‘धन वर्षा’, किंमत पाहून फिरतील डोळे
दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचे कोरोनामुळे निधन, तब्बल १०७ क्रिकेटपटूंची दिली होती साथ