सोमवारी(१० मे) भारतीय फुटबॉल जगतातील एक महत्त्वाचा तारा हरपला. भारताचे महान फुटबॉलपटू फोर्टुनाटो फ्रँको यांचे निधन झाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने(एआयएफएफ) याबाबद पुष्टी केली आहे. मात्र, त्यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाले याबाबत माहिती दिलेली नाही. फ्रँको ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
फ्रँको हे भारतीय फुटबॉल इतिहासातील सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या १९६० च्या दशकात भारतीय संघाचे भाग होते. त्यांनी १९६० ते १९६४ दरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ते १९६२ साली एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय फुलबॉल संघाचे भाग होते.
ते भारताचे उत्तम मिड-फिल्डर म्हणून ओळखले जायचे. त्यांचा १९६० सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश होता, पण त्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ते १९६२ साली जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होते.
फ्रँको यांनी भारताकडून एकूण २६ सामने खेळले. तसे १९६२ साली एशियन कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाकडूनही खेळले. तसेच मेर्देका कप स्पर्धेत १९६४ आणि १९६५ साली अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाचेही ते भाग होते.
त्यांच्यासाठी जकार्ता येथे १९६२ साली दक्षिण कोरिया विरुद्ध झालेला एशियन गेम्सचा अंतिम सामना अविस्मरणीय ठरला होता. त्यांनी जरनैल सिंग यांना गोल करण्यात असिस्ट केले होते. हा सामना भारताने २-१ असा जिंकत सुवर्णपदक जिंकले होते.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना एआयएफएफने जाहीर केलल्या निवेदनात अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे की ‘फ्रँको यांचे निधन झाले, ही वार्ता ऐकून खूप दु:ख झाले. ते भारतीय फुटबॉलमधील सुवर्ण पीढीचे सदस्य होते. त्यांनी १९६२ साली भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याचा महत्त्वाचा वाटा उचलला होता.’
AIFF condoles the death of 1962 Asian Games gold medallist Fortunato Franco
Read 👉 https://t.co/tyNOPaItZ5#RIP #IndianFootball pic.twitter.com/nSVzQjiYLQ
— Indian Football Team (@IndianFootball) May 10, 2021
फ्रँको हे ऑलिंपिकसाठी निवड झालेले गोव्याचे एकमेव फुटबॉलपटू होते. त्यांचा जन्म १९३७ साली गोव्यात झाला होता. पण ते वयाच्या ६ व्या वर्षीच कुटुंबासह मुंबईला स्थायिक झाले होते.
त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे संतोष ट्रॉफी स्पर्धेत नेतृत्वही केले होते. तसेच मुंबईत ते पश्चिम रेल्वे आणि टाटा फुटबॉल क्लबसाठीही खेळले. १९६६ साली त्यांना गुडघ्याची दुखापत झाली त्यामुळे त्यांची कारकिर्द जास्त लांबली नाही. फुटबॉलमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर त्यांनी टाटा समूहाच्या कंपनीत जनसंपर्क क्षेत्रात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. तिथून निवृत्त झाल्यानंतर ते गोव्यात परत गेले.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा स्म्रीती मंधना बनवते अंडा-भूर्जी आणि संघसहकारी घेतात तिची फिरकी, पाहा व्हिडिओ
कोरोनामुळे भारतीय क्रीडासृष्टीतील दोन तारे निखळले; एकाच दिवशी झाले दोन ऑलिंपिक सुवर्णपदकवीरांचे निधन
मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘शुटर दादीं’चा पराभव, रुग्णालयात उपचार चालू असताना झाला मृत्यू