जगातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाची लगबग सुरू झाली आहे. स्पर्धेतील जुन्या आठ संघानी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. तर, अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या फ्रॅंचाईजी देखील आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सहभागी होतील. तसेच, या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील आणखी काही नव्या खेळाडूंना संधी मिळेल. कर्नाटकच्या एका युवा यष्टिरक्षक फलंदाजावर देखील काही संघांची नजर पडली आहे.
गतवर्षी कर्नाटकचा यष्टिरक्षक फलंदाज लवनिथ सिसोदिया (Luvnith Sisodia) याने एका कॉर्पोरेट चषकाच्या वनडे सामन्यात केवळ १२९ चेंडूंवर ३१२ धावा काढलेल्या. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या सिसोदियामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची झलक दिसत असल्याचे बोलले जाते. तसेच त्याचे यष्टीरक्षण कौशल्य देखील अप्रतिम आहे. लवनिथ सध्या केवळ २१ वर्षांचा आहे.
आयपीएल संघांची पडली नजर
आयपीएल २०२२ साठी सर्व संघ देशांतर्गत क्रिकेटमधील युवा खेळाडू शोधत आहेत. लवनिथ याला तब्बल चार संघांनी ट्रायलसाठी बोलावले होते. यामध्ये पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचा समावेश आहे. पंजाब किंग्स संघाच्या ट्रायलमध्ये त्याने केवळ २६ चेंडूंमध्ये ६६ धावांची तुफानी खेळी केली होती. पंजाब संघाच्या ट्रायल्स बेंगलोरस्थित जस्ट क्रिकेट अकादमी येथे सुरू आहेत.
अंडर २५ स्पर्धेत केली शानदार कामगिरी
नुकत्याच संपन्न झालेल्या बीसीसीआयच्या अंडर २५ स्पर्धेमध्ये लवनिथने शानदार खेळ दाखवला होता. त्याचा स्ट्राईक रेट स्पर्धेतील तिसरा सर्वोत्तम स्ट्राइक रेट मानला गेला. पावर प्लेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३१ इतका जबरदस्त होता. लवनिथ हा आपल्या कामगिरीचे श्रेय प्रशिक्षक आर एक्स मुरली यांना देतो. तसेच, आगामी आयपीएल खेळण्याचे आणि भविष्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ स्पर्धा कुठे होणार? काय आहे बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’, घ्या जाणून (mahasports.in)