२०२१ चे वर्ष (Year 2021) संपायला आले आहे. कोरोना महामारीदरम्यान या वर्षात क्रिकेट चाहत्यांना टी२० विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि आयपीएलसारख्या रोमांचक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाल्या आहेत. बऱ्याचशा प्रतिभाशाली क्रिकेटपटूंनी या वर्षात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. मात्र काही दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला रामरामही ठोकला आहे. यात नुकत्याच निवृत्ती जाहीर केलेल्या हरभजन सिंगसहित दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स यांचा समावेश आहे. याच क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
वर्ष २०२१ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे दिग्गज (Major Retirement In 2021)
१. एबी डिविलियर्स- या यादीतील पहिले नाव एबी डिविलियर्स (AB De Villiers) याचे. या विस्फोटक फलंदाजाने नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी२० सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या तिन्ही स्वरुपात मिळून त्याने ५० च्या अधिक सरासरीने फलंदाजी करताना २००१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४७ शतके निघाली आहेत.
२. ड्वेन ब्रावो- युएई आणि ओमानमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ मध्ये वेस्ट इंडिज संघाचे प्रदर्शन अतिशय निराशादायी राहिले. यानंतर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwyane Bravo) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला. आतापर्यंत ७ टी२० विश्वचषक खेळणाऱ्या ब्रावोने २०१२ आणि २०१६ मध्ये आपल्या संघाला विजेतेपदक मिळवून दिले आहे. २००४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते निवृत्तीपर्यंत त्याने ४० कसोटी, १६४ वनडे आणि ९१ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६००० धावा आणि ३६३ विकेट्स घेतल्या आहेत.
३. डेल स्टेन- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून ६९९ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या कसोटीतील ४३९, वनडेतील १९६ आणि टी२० क्रिकेटमधील ६४ विकेट्सचा समावेश आहे. तसेच स्टेन कारकिर्दीत २३४३ दिवस कसोटीतील अव्वल गोलंदाज राहिला होता, जो एक विश्वविक्रम आहे.
४. असगर अफगाण- अफगानिस्तानचा असगर अफगाण (Asghar Afghan)ने टी२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभवानंतर त्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ६ कसोटी, ११४ वनडे आणि ७५ टी२० सामने खेळले होते.
५. हरभजन सिंग- भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०१६ पासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या भज्जीने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने आतापर्यंत भारताकडून १०३ कसोटी, २३६ वनडे आणि २८ टी२० सामने खेळले आहेत. तसेच तो २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ चा वनडे विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या संघाचा २०२१ मध्ये सर्वाधिक ‘डक’चा नकोसा विक्रम, पण ‘या’ ५ पठ्ठ्यांनी राखली लाज
२०२१ गाजवणारे टॉप टी२० फलंदाज; भारतीयांनी केली सपशेल निराशा
हेही पाहा-