क्रिकेटमध्ये २०२१ या संपूर्ण वर्षात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. यावर्षी आयसीसी टी२० विश्वचषक (icc t20 world cup) देखील खेळला गेला. टी२० मध्ये यावर्षी जगभरातील अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून दाखवले. पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषकात आणि एकंदरीत या संपूर्ण वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले. पाकिस्तानचे सलामीवर बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. टी२० आंतरराष्ट्रीयमधील (t20i) त्यांचे यावर्षीचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले. तर दुसरीकडे भारतीय संघाचे यावर्षीचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (rohit sharma) याने यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, यावर्षी टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यां पहिल्या पाच खेळाडूंमध्ये तो सामील होऊ शकला नाही. त्याने यावर्षी खेळलेल्या ११ टी२० सामन्यांमध्ये ४२४ धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत १९ व्या स्थानावर राहिला. आपण या लेखात त्या पाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी २०२१ मध्ये सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय धावा केल्या.
५. जोस बटलर, इंग्लंड –
इंग्लंड संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर यावर्षी सर्वाधिक टी२० धावा करणाऱ्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी १४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ५८९ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी ६५.४४ आणि स्ट्राइक रेट १४३.३० होता. या धावांमध्ये त्याच्या पाच अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. यामध्ये त्याने १०१ धावांची सर्वोत्तम खेळी केली.
४. मिचेल मार्श, ऑस्ट्रेलिया –
यावर्षी सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू मिचेल मार्श आहे. त्याने यावर्षी २१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यामध्ये ६२७ धावा केल्या. या धावा त्याने ६ अर्धशतकांच्या जोरावर केल्या आणि यामध्ये त्याच्या ७७ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२९.८१ होता आणि सरासरी ३६.८८ होती.
३. मार्टिन गप्टिल, न्यूझीलंड –
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल आहे. गप्टिलने यावर्षी १८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यामध्ये ६७८ धावा केल्या. या धावांमध्ये त्याच्या पाच अर्धशतकांचा देखील समावेश आहे, यादरम्यान त्याने ९७ धावांची सर्वोत्तम खेळी केली. यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याची सरासरी ३७.६६ आणि स्ट्राइक रेट १४५.४९ होता.
२. बाबर आझम, पाकिस्तान –
पाकिस्तानचा उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने यावर्षी २९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ९३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ९ वेळा अर्धशतक, तर एकदा शतकी खेळी केली. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२२ होती. या धावा त्याने ३७.५६ च्या सरासरीने आणि १२७.५७ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत.
१. मोहम्मद रिझवान, पाकिस्तान –
पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. त्याने यावर्षी एकूण २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक १३२६ धावा बनविल्या आहेत. या धावा त्याने ७३.६६ च्या सरासरीने आणि १३४.८९ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १२ अर्धशतकांचा आणि १ शतकाचा समावेश आहे. यादम्यान रिझवानने १०४ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या –
SAvsIND, 1st Test, Live: दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाचा अडथळा; खेळ उशीराने होणार सुरू
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होती राहुल-मयंक यांची रणनिती? स्वतः सलामीवीराने केला खुलासा
व्हिडिओ पाहा –