प्रो कबड्डीचा सहावा मोसम संपून महिनाच झाला असतानाही सातव्या मोसमाची तयारीही सुरु झाली आहे. सातवा मोसम 19 जूलै 2019 पासून सुरु होणार आहे. या मोसमातील छोटा लिलाव लवकरच पार पडेल. तसेच फ्यूचर कबड्डी हिरोजसाठी निवड झालेल्या खेळाडूंचाही लिलावावेळी समावेश केला जाणार आहे.
2017 मध्ये प्रो कबड्डी संघाचे प्रायोजक मशाल स्पोर्ट्स आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघाने मिळून फ्यूचर कबड्डी हिरोज प्रोग्रामची घोषणा केली होती. हा प्रोग्राम भविष्यातील कबड्डी चॅम्पियन्स घडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी व्यापक तीन-स्तरीय कौशल्य स्काउटिंग स्वरुपातील आहे.
या प्रोग्रामसाठीचे ट्रायल्स हे 5 आणि 6 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, शिवाजी पार्क, मुंबई येथे सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहेत. यावेळी खेळाडूंनी ओळखपत्र म्हणून त्यांचे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र बरोबर आणणे गरजेचे असेल.
त्याचबरोबर पात्रता निकषाप्रमाणे खेळाडूचे वजन 85 किलोपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच त्याचा जन्म 10 मार्च 1997 ते 1 फेब्रुवारी 2001 दरम्यान झालेला असावा. त्याचबरोबर खेळाडूने जिल्हा किंवा शालेय स्थरावर कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा, याचे प्रमाणपत्रही त्याने जवळ बाळगणे आवश्यक असेल.
याबरोबरच खेळाडूला या ट्रायल्ससाठी क्रिडा पोषाखात(जर्सी,शॉर्ट्स,कबड्डी/स्पोर्ट्स शूज) यावे लागेल. या खेळाडूंची डोपिंग चाचणी सिलेक्शन पॅनलच्या निर्णयानुसार केली जाईल. ज्या खेळाडूंची ऑल इंडिया प्लेयर पूल 2018 साठी मुंबई कॅम्पसाठी निवड झाली आहे त्यांना या ट्रायल्सला उपस्थित राहण्याची गरज नाही.
मागील वर्षी या ट्रायल्ससाठी 4600 खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील 133 खेळाडू 2017 प्रो कबड्डीच्या लिलावासाठी पात्र ठरले. या प्रोग्राममधून नितीश कुमार हा खेळाडू सर्वांसमोर आला आहे. त्याला पाचव्या मोसमात यूपी योद्धाने संघात घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय रेल्वे संघाने जिंकले ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
–ISL 2018-19: दिल्लीकडूनही ब्लास्टर्सला पराभवाचा धक्का