भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारपासून ब्रिस्बेनच्या गाबा येथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या मैदानावर भारतीय संघाचा हा शेवटचा कसोटी सामना असेल. यामागचं कारण काय ते आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
वास्तविक, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. याच शहरात 2032 मध्ये ऑलिम्पिक खेळांचंही आयोजन होणार आहे. या खेळाच्या महाकुंभाच्या तयारीसाठी सध्या शहरात बदलाचं वारं वाहत आहे. गाबाचं क्रिकेट स्टेडियम देखील बदलासाठी सज्ज आहे.
गाबाच्या स्टेडियमचं नूतनीकरण होणार असून त्यासाठी 1.6 अब्ज डॉलर्स (1375 कोटी) खर्च करण्यात येणार आहेत. यानंतर स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 50 हजारांपर्यंत वाढली जाईल. तसेच या स्टेडियममध्ये अनेक आधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. गाबा स्टेडियमवर ऑलिम्पिक खेळांचं उद्घाटन, समारोप समारंभ तसेच इतर खेळांच्या स्पर्धा आयोजित होणार आहे.
तज्ञांच्या मते, पुनर्विकासानंतर गाबाच्या मैदानावर कसोटी क्रिकेट होणं शक्य नाही. शहरातील नवीन व्हिक्टोरिया पार्क स्टेडियम भविष्यात कसोटी सामन्यांसाठी पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत आहे. भारतीय संघ आता गाबा स्टेडियममध्ये आपला शेवटचा सामना खेळेल. तर पुढील वर्षी ॲशेस मालिकेतील अंतिम कसोटी सामना या स्टेडियमवरील शेवटचा कसोटी सामना असेल.
तसं पाहिलं तर, गाबा स्टेडियमचा इतिहास फार जुना आहे. या मैदानावर 1931 पासून कसोटी सामन्यांचं आयोजन होत आहे. भारतीय संघासाठी हे मैदान स्पेशल आहे, कारण 2021 मध्ये टीम इंडियानं याच मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकली होती. गेल्या 32 वर्षांत ऑस्ट्रेलियाचा या मैदानावरील तो पहिला पराभव होता. सध्याच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 ने बरोबरीत आहेत. आता दोन्ही संघ गाबामध्ये विजयाची नोंद करून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील.
हेही वाचा –
पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, एका वर्षात दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती
सूर्यकुमार यादवचं मोठं मन, रहाणेच्या शतकासाठी हा त्याग केला
पॅट कमिन्सचा भारतीय संघाला इशारा, गाबा कसोटीत ऑस्ट्रेलिया या घातक प्लॅनसह खेळणार