इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२१) मंगळवारी डबल हेडर सामने खेळले गेले. दिवसाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात रोमांचक सामना झाला. सामन्यादरम्यान अनेकदा वादात सापडलेला दिल्लीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा वादात अडकला. अश्विन केकेआरचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि नंतर कर्णधार ओएन मॉर्गन यांच्याशी वाद घालताना दिसला. दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपल्यानंतर, संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग देखील पंचांशी या विषयावर बोलताना दिसले. त्याआधी, भारतीय सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर या घटनेवर नाखूष दिसून आला.
अश्विनने घेतला पंगा
या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरचा कर्णधार मॉर्गनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला दिल्लीचा संघ केकेआरच्या शानदार गोलंदाजीचा सामना करू शकला नाही आणि निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२७ धावा करू शकला. दिल्लीच्या फलंदाजीदरम्यान, अश्विन केकेआरचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीसोबत भिडला होता. यानंतर त्याच्या आणि केकेआरचा कर्णधार मॉर्गन यांच्यातही काही वाद झाले. डावाच्या समाप्तीनंतर दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ हे मैदानाच्या पंचांशी याच गोष्टीबद्दल बोलताना दिसले.
गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया
या सामन्यादरम्यान समालोचन करत असलेला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर या घटनेबाबत नाखूष दिसला. समालोचन करताना तो म्हणाला,
“प्रशिक्षकाने प्रशिक्षकाचेच काम करावे. त्यांनी मैदानावर येऊन प्रत्येकवेळी मध्यस्थी करू नये. मैदानावर प्रत्येक वेळी तुम्ही पाय टाकू शकत नाही. तुम्ही प्रशिक्षक आहात आणि तुमची मर्यादा डग आऊटपर्यंत असावी. ही बाब दोन खेळाडूंमधील असून येथे कोचिंग स्टाफचे कोणतेही काम नाही. जर कोणी या प्रकरणात निर्णय घेऊ शकत असेल, तर ते मॅच रेफ्री आणि मैदानी पंच आहेत. या प्रकरणात प्रशिक्षक कधीही मैदानावर येऊ नये.” गंभीरने २०१८ मध्ये रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले.






