दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन हे भारताचे सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. प्रशिक्षकपदाच्या कालावधीत भारतीय संघाने 2009 साली कसोटीमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर दोनच वर्षात भारताने 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. भारताच्या या यशात कर्स्टन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा कोणताही अनुभव नसताना प्रशिक्षकपदाचा काटेरी मुकुट परिधान केले होते. बीसीसीआयने त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीबाबत कर्स्टन यांनी खुलासा केला की, “अवघ्या सात मिनिटात त्यांची प्रशिक्षकपदासाठी मुलाखत झाली होती. त्यांची निवड करण्यात लिटल मास्टर सुनील गावस्कर यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.”
कर्स्टन ‘क्रिकेट कलेक्टिव’ पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाले होते, “भारतीय संघाचे प्रशिक्षक होणार का? असा विचारणारा मेल सुनील गावसकर यांनी केला होता. गावसकर माझी चेष्टा करताहेत असेच काहीवेळ वाटले. मी त्यावेळी हसलो. काही दिवसांनंतर तुम्ही मुलाखतीला येणार का? असा मेल आला. हा मेल मी माझ्या पत्नीला दाखवला आणि म्हणालो ते चुकीच्या माणसांची निवड करत आहेत. पुढे प्रशिक्षकपदाचा कोणताच अनुभव नसतानाही माझी निवड करण्यात आली.”
“जेव्हा मी मुलाखत देण्यास भारतात पोहचलो. त्यावेळेस मला तत्कालीन कर्णधार अनिल कुंबळे भेटला. प्रशिक्षकपदाचा मी दावेदार असल्याची संभावना व्यक्त केल्यानंतर आम्ही दोघंही हसलो. कुंबळेने मला विचारले, तू येथे काय करतोस? मी म्हणालो, तुझा प्रशिक्षक होण्यासाठी मुलाखत देण्यासाठी भारतात आलोय. हे ऐकताच कुंबळे हसू लागला. त्यानंतर मी ही हसलो, कारण ही हसण्यासारखीच गोष्ट होती.”
कर्स्टन मुलाखत देत होते तेव्हा रवी शास्त्री यांनी त्यांचे काम सोपे केले होते. कर्स्टन म्हणाले की, “प्रशिक्षक होण्यासाठी मला केवळ सात मिनिटे लागले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसमोर माझी मुलाखत सुरू झाली. वातावरण थोडे गंभीर होते. बोर्डाचे सचिव यांनी मला प्रश्न विचारला की, तुम्ही भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी काय नियोजन केले आहे? मी म्हणालो, माझ्याजवळ कोणतेच नियोजन नाही. मला या तयारीसाठी कुणी सांगितलेच नाही. मी आत्ताच भारतात पोहोचलो आहे.”
समितीमधील रवी शास्त्री मला म्हणाले, गॅरी आम्हाला सांगा दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू म्हणून भारतीय संघाला हरवण्यासाठी आपण काय कराल? “मी या प्रश्नाचे उत्तर दोन मिनिटात दिले. माझ्या या उत्तराने रवी शास्त्री आणि बोर्डातील सदस्य खूपच प्रभावित झाले. त्यानंतर तीन मिनिटातच बोर्डाच्या सचिवांनी माझ्यासमोर करारपत्र ठेवले. अवघ्या सात मिनिटांत माझी मुलाखत संपली”, असेही कर्स्टन यांनी नमूद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: जेव्हा गॅरी कर्स्टनसाठी धोनीने रद्द केली होती टीम इंडियाची ट्रीप
विश्वचषकाच्या धामधूमीत क्रिस्तियानो रोनाल्डो-मॅंचेस्टर युनायटेड नाते संपुष्टात, क्लबने जाहीर केले ‘हे’ निवेदन