आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सची मालकी असलेल्या CVC कॅपिटल पार्टनर्सनं संघातील बहुतांश हिस्सा विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. CVC ने 2021 मध्ये 5625 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन चार वर्षांसाठी फ्रँचायझी खरेदी केली होती.
बीसीसीआयनं आयपीएलबाबत तयार केलेल्या नियमांनुसार, आयपीएल फ्रँचायझीची मालकी विकत घेणारी कोणतीही कंपनी निश्चित लॉक-इन कालावधीपूर्वी तिचा हिस्सा इतर कोणत्याही कंपनीकडे हस्तांतरित करू शकत नाही. CVC कॅपिटल पार्टनर्सचा हा लॉक-इन कालावधी फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपनं गुजरात टायटन्स फ्रँचायझीची मालकी खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
सीव्हीसी ग्रुपला फ्रँचायझीच्या मालकीतून बाहेर पडायचं आहे. अदानी ग्रुपनं फ्रँचायझीसाठी 5100 कोटी रुपयांची बोली लावली आहे, तर टोरेंट ग्रुपनं 4653 कोटी रुपयांची बोली लावली आहे. गुजरात टायटन्स ही तीन वर्षे जुनी फ्रँचायझी आहे. तिचं मूल्य एक अब्ज डॉलर्स ते दीड अब्ज डॉलर्स दरम्यान असू शकतं. आता गुजरात टायटन्सची मालकी कोणता ग्रुप घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
गौतम अदानी यांनी यापूर्वी देखील क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी ग्रुपकडे महिला प्रीमियर लीग (WPL) आणि UAE-BRD इंटरनॅशनल लीग टी20 लीग मधील संघांची मालकी आहे. अदानी यांनी 2023 मध्ये WPL मधील अहमदाबाद फ्रँचायझी 1,289 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली होती.
जर आपण आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या कामगिरीबद्दल बोललो तर, संघानं आतापर्यंत एकूण 3 हंगाम खेळले, ज्यामध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गुजरातनं 2022 मध्ये आपल्या पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. तर 2023 मध्ये ते उपविजेते राहिले होते. मात्र आयपीएल 2024 मध्ये गुजरातची कामगिरी काही खास राहिली नाही. संघ 14 पैकी फक्त 5 सामने जिंकू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीर हेड कोच बनताच केकेआरच्या खेळाडूंची चांदी, दोघांची थेट भारतीय संघात एंट्री
आशिया चषक 2024 : भारतानं पाकिस्तानला सहज धूळ चारली, गोलंदाजांची चमकदार कामगिरी
फक्त 3 वर्षांत टीम इंडियाने पाहिलेत तब्बल 11 कर्णधार! चौघे आहेत महाराष्ट्रीयन…