गौतम गंभीरनं 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला. आपल्या 13 वर्षांच्या उत्कृष्ट कारकिर्दीदरम्यान गंभीर अनेक वादांमुळे चर्चेत राहिला. निवृत्तीनंतरही तो सतत चर्चेत असतो. मैदानावरील इतर खेळाडूंशी भांडण असो किंवा स्फोटक वक्तव्य असो, गौतम गंभीर कधीही लाईमलाईटपासून दूर राहिला नाही. आज (14 ऑक्टोबर) गंभीरचा 43वा वाढदिवस आहे. या दिवशी आपण गौतम गंभीर आणि वाद, यांच्याविषयी थोडफार जाणून घेऊया.
गौतम गंभीर विरुद्ध शाहिद आफ्रिदी (2007)
कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात जोरदार वाद झाला होता. गंभीर वेगानं धाव घेण्याचा प्रयत्नात आफ्रिदीला भिडला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. हा वाद चाहत्यांमध्ये आजही चर्चेचा विषय असतो.
गौतम गंभीर विरुद्ध विराट कोहली (2013)
आयपीएल 2013 दरम्यान गौतम गंभीरचा विराट कोहलीसोबत मोठा वाद झाला होता. या सामन्यात गंभीरनं कोहलीची विकेट आक्रमकपणे साजरी केली. त्यामुळे कोहली संतापला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला, ज्यानंतर रजत भाटियानं दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ही घटना त्यावेळी क्रिकेट जगतात चांगलीच गाजली होती.
गंभीरचं समाजसेवेतील योगदान
गौतम गंभीर केवळ क्रिकेटमध्येच नाही तर समाजसेवेतही सक्रिय आहे. 2018 मध्ये त्यानं दिल्लीत हिजरा हब्बाच्या सातव्या आवृत्तीचं उद्घाटन केलं. यामध्ये त्यानं ट्रान्सजेंडर समुदायाच्या समर्थनार्थ साडी आणि टिकली परिधान करून भाग घेतला होता. यापूर्वी त्यानं ट्रान्सजेंडर्सना राखी बांधण्यासारख्या उपक्रमात भाग घेतला होता. यावरून त्याची सामाजिक जाणीव दिसून येते.
राजकारणात पाऊल टाकलं
2019 मध्ये गौतम गंभीरला भारतीय जनता पार्टीनं पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. येथे त्यानं आम आदमी पार्टीची आतिशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली यांचा पराभव करून संसदेत प्रवेश केला. मात्र 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यानं राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर बनला. आता तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे.
हेही वाचा –
जम्मू-काश्मीरच्या खेळाडूचा धमाका! रणजी ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
टीम इंडियात पुन्हा होणार राहुल द्रविडची एन्ट्री? अचानक आले खेळाडूंना भेटायला; धक्कादायक व्हिडिओ समोर
कर्णधारच आहे भारताच्या पराभवाचं कारण, ही चुकी पडली महागात