आठ वर्षांपूर्वी भारताने मिळवलेल्या 2011 च्या विश्वचषक विजयात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा मोठा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र त्याचे शतक केवळ 3 धावांनी हुकले. पण आता हे शतक हुकण्यामागील कारण सांगताना गंभीरने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल विवादात्मक विधान केले आहे.
गंभीरने सांगितले की त्यावेळीचा कर्णधार धोनीने त्याला शतक पूर्ण करण्याबद्दल आठवण करून दिली होती ज्यामुळे त्याचा गोंधळ झाला आणि त्याला परिणामी विकेट गमवावी लागली.
“मला हा प्रश्न बर्याच वेळा विचारण्यात आला आहे, जेव्हा मी 97 धावांवर होतो तेव्हा काय झाले होते. मी सर्वांना सांगतो की 97 धावांवर येण्यापूर्वी मी माझ्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला नव्हता, माझे लक्ष केवळ श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाकडे होते.” असे गंभीर लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
“मला आठवत आहे की एक षटक पूर्ण झाल्यावर धोनीने मला सांगितले की, तीन धावा बाकी आहेत, या तीन धावा कर आणि तुझे शतक पूर्ण होईल’,” असे गंभीर पुढे म्हणाला.
तसेच गंभीरने पुढे म्हटला की धोनीने शतकाची आठवण करुन दिल्याने गोंधळ झाला आणि तो शतकाचा विचार करायला लागला.
“जेव्हा तुमचे मन अचानक तुमची वैयक्तिक कामगिरीकडे, वैयक्तिक धावसंख्येकडे वळते तेव्हा कुठेतरी तुम्ही गोंधळून घाई करता. त्या क्षणापूर्वी माझं लक्ष्य फक्त श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्याकडे होतं. जर तेच लक्ष्य माझ्या मनात राहिले असते तर कदाचित मी सहजपणे माझे शतक ठोकले असते,” असेही पुढे गंभीर म्हणाला.
“मी 97 धावा होईपर्यंत मी वर्तमानात होतो. पण शतक होण्यापासून मी फक्त तीन धावा दूर असल्याचे मला समजताच, शतक करण्याच्या इच्छेमुळे उत्सुकता निर्माण झाली. त्याचमुळे वर्तमानात रहाणे महत्वाचे आहे.”
“जेव्हा मी बाद झाल्यावर ड्रेसिंग रूमकडे परत जात होतो, तेव्हा मी स्वत: ला म्हणालो की या तीन धावा मला आयुष्यभर त्रास देतील आणि ते सत्य आहे. आजपर्यंत लोक मला विचारतात की मी या तीन धावा का करु शकलो नाही?”
2011 च्या विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवले होते. या अंतिम सामन्यात भारताकडून गंभीरने सर्वाधिक 97 धावा केल्या होत्या. तसेच धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर गंभीर आणि धोनीमध्ये चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 109 धावांची भागीदारी झाली होती.
या कारणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दिग्गज खेळाडूला सुनावली मोठी शिक्षा
वाचा👉https://t.co/exmnOYud6w👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019
https://twitter.com/Maha_Sports/status/1196306239841398784