भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. असे असले तरीही, त्याला आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात अष्टपैलूच्या भूमिकेत निवडले गेले आहे. पण सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात त्याने अजून एकही चेंडू टाकलेला नाही. अशातच भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. हार्दिकला येत्या टी२० विश्वचषकात अष्टपैलूच्या भूमिकेत निवडले असून तो गोलंदाजी करत नसल्यामुळे गंभीरने त्याच्यावर ही टीका केली आहे. हार्दिकव्यतिरिक्त गंभीरने निवडकर्त्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हार्दिकने श्रीलंका दौऱ्यावर शेवटचा चेंडू टाकला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली नाही. फिटनेसच्या कारणास्तव आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यात त्याला मुबई इंडियन्सने खेळवले नव्हते. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला सामील केले गेले आहे, पण त्याने अध्याप एकही चेंडू फेकलेला नाही. इएसपीएन क्रिकइंफोवर बोलताना गंभीरने हार्दिकविषयी निराशा व्यक्त केली आहे. हांर्दिकला जर विश्वचषकात गोलंदाजी करायची असेल, तर त्याला आतापासूनच सुरुवात करावी लागणार असल्याचे गंभीरने सांगितले आहे.
गंभीर म्हणाला, “मुंबईच्या फलंदाजीमध्ये हार्दिक एक मोठी समस्या आहे. त्याने काहीचं खेळी केली नाही, तो आता माझ्यासाठी केवळ एका प्रकारातील खेळाडू आहे. तो केवळ पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळतो. त्याने यावर्षी चांगले प्रदर्शन केलेले नाही आणि तो टी२० विश्वचषक संघात सामील झाला आहे. त्याने यंदा गोलंदाजीच केलेली नाही. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे.”
गंभीरने निवडकर्त्यांवरही प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला की, “निवडकर्त्यांना शक्यतो या गोष्टीचे उत्तर द्यावे लागणार आहे की, तो खरच विश्वचषकात ४ षटके फेकणार आहे का आणि जर तो असे करण्याचा निर्णय घेतो, तर तो असे करण्याच्या स्थितीमध्ये आहे का? जर त्याने विश्वचषकात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला आतापासूनच गोलंदाजीला सुरुवात करावी लागणार आहे. त्याने प्रत्येक सामन्यात एक, दोन षटके गोलंदाजी केली तरी चालेल, जेणेकरून तो विश्वचषकादरम्यान प्रदर्शन करू शकेल. येथे भारताला ही स्पर्धा जिंकायची आहे. पण जर तो असा करू शकला नाही, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील नाही केले पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आयपीएलमध्ये संधी देण्याच्या नावावर युवा खेळाडूंना लाखोंचा गंडा, मोठमोठी नावे यादीत





