भारतीय संघाचे दिग्गज एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांनी जवळपास १० वर्षांपर्यंत भारतीय संघाचे ड्रेसिंग रूम शेअर केले आहे. गंभीर अनेक वर्ष धोनीच्या नेतृत्वात खेळला. तसेच धोनीच्या नेतृत्त्वाखाली २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक जिंकवण्यात गंभीरने महत्वाची भूमिका पार पाडली. असे असले तरी, गंभीर आणि धोनी यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा नेहमी कानावर पडतात. आता गंभीरने धोनीसोबत त्याचे संबंध कसे आहेत याचा खुलासा केला आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) जेव्हा खेळण्यासाठी उपलब्ध नसायचा, तेव्हा बऱ्याचदा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला भारतीय संघाचे नेतृत्व करावे लागायचे. त्याने ६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धूरा सांभाळली. गंभीर त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो आणि याच कारणास्तव तो अनेकदा टीकाकारांच्या निशाण्यावर येतो.
दरम्यान, जतीन सप्रूसोबत यूट्यूब चॅनलवर बोलताना गंभीरने धोनीसोबत त्याच्या संबंधांविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यावेळी गंभीरने धोनीचे खूप कौतुक केले आणि धोनी त्याला आवडत नाही, या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे सांगितले.
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर म्हणाला, “एमएस धोनीसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. मी ही गोष्ट ऑन एअर बोललो आहे, हीच गोष्ट मी १३८ कोटी लोकांच्या समोर देखील बोलू शकतो. त्याला आयुष्यात कधी गरज पडणार नाही, पण जर गरज पडलीच, तर त्याच्या शेजारी उभा राहणारा पहिला व्यक्ती मी असेल. त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेले गोयदान मोलाचे आहे.”
आयसीसीने २००७ साली पहिला टी-२० विश्वचषक आयोजित केला होता आणि धोनीला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यावर्षी भारताने विश्वचषक जिंकून सर्वांना चकीत केले होते. पुढे २००८ मध्ये धोनी तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्व करू लागला. त्याच्याच नेतृत्वात भारताने २०११ सालचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने ९१, तर गंभीरने ९७ धावांची महत्वाची खेळी केली होती. दोघांमध्ये १०९ धावांची भागीदारी पार पडलेली.
दरम्यान, गंभीरने २००३ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तर धोनीला २००४ साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१६ साली गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर धोनीने मात्र २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१९ विश्वचषकात धोनीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन दिग्गजाला बघायचाय ‘हिटमॅन’चा राग; म्हणाला, ‘रोहितला कठीण जाणारंय…’
मागच्या हंगामात फेल झालेला ‘हा’ पठ्ठ्या म्हणतोय, ‘मला सनरायझर्सचे पैसे परत करायचेत…’
पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधारापुढे असतील बरीच आव्हाने, माजी कॅप्टनने केले सावधान