मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धावांचा रतीब घालत आपला दबदबा निर्माण केला आहे. सामन्यागणिक बहारदार कामगिरी करणाऱ्या विराटने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली. सध्या तो त्याच्या दैदीप्यमान फॉर्ममध्ये आहे. उफाळलेल्या समुद्रासारखी फलंदाजी करत त्याने कसोटीत 27 आणि वनडेत 43 शतके ठोकली. यातील अनेक शतकांना विजयाचं सौभाग्य मिळालं.
आपल्या कारकिर्दीत दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विराट कोहलीला आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम खुणावत आहे. एक शैलीदार फलंदाजीचा राजपुत्र वाटणाऱ्या विराटने वैयक्तिक कामगिरी दमदार केली. यात दुमत नाही. कर्णधार या नात्याने आयसीसीची कोणतीच ट्रॉफी त्याला अद्याप जिंकून देता आली नाही. इतकेच नव्हे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचे नेतृत्व करतानाही आयपीएलची ट्रॉफी जिंकून देऊ शकला नाही. याच मुद्द्याला धरून भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने कोहलीवर निशाणा साधला आहे.
कार्यक्रमात गौतम गंभीर बोलताना म्हणाला की, “कोहलीला कर्णधार म्हणून अजून खूप काही सिद्ध करायचे आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो विराट कोहलीने स्वतः खूप धावा केल्या आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या संघासाठी मोठी ट्रॉफी जिंकून देत नाही तोपर्यंत तुम्हाला गांभीर्यपूर्वक घेतले जात नाही. ब्रायन लारा, जॅक कॅलिस सारखे दिग्गज खेळाडू आपल्या कारकीर्दीत खोऱ्याने धावा काढल्या. पण अनेक गोष्टी त्यांना साध्य करता आल्या नाहीत.”
तो म्हणाला, “संघातील प्रत्येक खेळाडू हा इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्याकडून चांगली कामगिरी कशी करून घ्यायचे हे कर्णधाराच्या हातात असते. प्रत्येक खेळाडूकडे कोहलीसारखी क्षमता नाही. पण ते खेळाडू जसे आहेत तसेच त्यांना कर्णधार म्हणून कोहलीने स्वीकारले पाहिजे. कोहलीबरोबर त्यांची तुलना करून चालणार नाही. प्रत्येक खेळाडूकडे चांगल्या वाईट गोष्टी असतात. ती त्याची ताकद आणि कमजोरी असते. या सर्व गोष्टींची मिळूनच एक चांगली टीम बनते.”
तो म्हणाला, “मोहम्मद शमी कधी जसप्रीत बुमराह होऊ शकत नाही किंवा इशांत शर्मा कधी बुमराह होऊ शकत नाही. किंवा केएल राहुल कधी कोहली होऊ शकत नाही. कोहलीसारखी प्रतिभा आणि ‘इंटेन्सिटी’ मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यात असू शकत नाही. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे.कठिण परिस्थितीत या खेळाडूंकडून तुम्ही चांगली कामगिरी कशी करून घेता यावरच संघ मोठ्या स्पर्धा जिंकू शकतो.”






