अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात ट्रॉफीसाठी होणाऱ्या महासामन्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी चाहत्यांच्या मनात थोडी धाकधूक नक्कीच आहे. पण याच दरम्यान एक असा रंजक विक्रम समोर आला आहे, जो पाहून भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित होईल.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir Head Coach of team india) यांचा एक खास रेकॉर्ड आहे. खेळाडू असो वा प्रशिक्षक, गंभीर ज्या ज्या वेळी फायनलमध्ये पोहोचले आहेत, त्यांच्या संघाला कधीही पराभवाचे तोंड पाहावे लागलेले नाही.
2007 टी-20 वर्ल्ड कप
24 सप्टेंबर 2007 रोजी भारत-पाकिस्तान फायनलमध्ये गंभीरने 75 धावांची शानदार खेळी केली होती. भारताने हा सामना जिंकून पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरले.
2011 वर्ल्ड कप (ODI)
श्रीलंकेविरुद्धच्या ऐतिहासिक फायनलमध्ये गंभीरने सर्वाधिक 97 धावा करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
आयपीएल 2012
कोलकाता नाईट राइडर्सचा (KKR) कर्णधार असताना गंभीरने चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच मैदानात हरवून केकेआरला पहिले जेतेपद मिळवून दिले.
आयपीएल 2014
पुन्हा एकदा गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करत दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
आयपीएल 2024
या हंगामात गंभीर कोलकाता संघासोबत ‘मेंटर’ म्हणून जोडले गेले होते, येथेही संघाने फायनल गाठली आणि विजेतेपद पटकावले.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने दुबईत न्यूझीलंडला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
थोडक्यात सांगायचे तर, गौतम गंभीर जिथे फायनलमध्ये असतात, तिथे विजय निश्चित मानला जातो. हाच शुभ संकेत आज अहमदाबादमध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवू शकतो.





