भारताचा माजी सलामीवीर व आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मेंटर गौतम गंभीर हा संघाचे मेंटरपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून प्रस्ताव आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता मिळत असलेल्या वृत्तानुसार गंभीर आगामी हंगामात कोणत्याच संघाचा भाग असणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आधी केकेआरचा कर्णधार म्हणून छाप पडल्यानंतर मागील दोन वर्षांपासून गंभीर नव्याने दाखल झालेल्या लखनऊ सुपरजायंट्स या संघाचा मेंटर बनलेला. त्याच्या नेतृत्वात संघाने दमदार कामगिरी करत दोन्ही वेळेस प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. मात्र, पुढील वर्षी तो संघाचा भाग नसेल असे बोलले जात आहे. केकेआर त्याला आपला मेंटर बनवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सध्या घडत असलेल्या घडामोडीनुसार तो आयपीएल 2024 मध्ये कोणत्याच संघाचा भाग नसेल.
गंभीर हा सक्रिय राजकारणात सहभागी आहे. भारतीय जनता पक्षाचा दक्षिण दिल्ली येथील तो खासदार असून, आपल्या मतदारसंघात विविध कामे करताना दिसतो. त्याने अनेक लोकोपयोगी कामे केली असल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा त्याला तिकीट मिळू शकते. या निवडणुका एप्रिल व मे महिन्यात पार पडतील. याच काळात आयपीएल देखील आयोजित होते. त्यामुळे गंभीर प्रचारात व्यस्त असेल. याच कारणाने त्याला आयपीएलसाठी वेळ देता येणार नाही.
गंभीर आपल्या मतदारसंघात गरजू लोकांसाठी एक रुपयात भोजन ही अनोखी सेवा देतो. तसेच अनेक गरजूंना वेळोवेळी तो मदत करताना दिसला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीतही त्याचे पारडे जड असल्याचे बोलले जाते.
(Gautam Gambhir unlikely to be part of IPL 2024 due to elections)
महत्त्वाच्या बातम्या-
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण