---Advertisement---

“अश्विन असावा दिल्लीचा पुढील कर्णधार”; दिग्गज भारतीय सलामीवीराने व्यक्त केली इच्छा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 12:03 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ संपल्यानंतर, चाहत्यांना पुढील हंगामात बरेच बदल दिसतील. अनेक संघांतील काही प्रमुख खेळाडू दुसऱ्या संघाचा भाग असू शकतील. याबाबत चाहत्यांपासून क्रिकेटतज्ञापर्यंत सर्वच जण आपआपली मते मांडत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाकडेही जबरदस्त खेळाडू आहेत आणि पुढील हंगामात संघामध्ये बरेच बदल दिसू शकतात. चालू हंगामात रिषभ पंत कर्णधार म्हणून महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दबावाखाली येताना दिसला आणि यामुळे त्याच्याकडून अनेक चुकीचे निर्णयही घेतले गेले.

थरारक सामन्यात दिल्लीचा पराभव

बुधवारी (१३ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या क्वालिफायर २ सामन्यामध्ये दिल्ली संघाला एका थरारक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. एका क्षणी, केकेआर सहज विजयाच्या दिशेने जात असल्याचे दिसत होते परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले. सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला आणि अश्विननेही दोन बळी घेतले. पण, राहुल त्रिपाठीच्या एका षटकाराने सामना केकेआरच्या बाजूने फिरला आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

अश्विन असावा पुढील हंगामात कर्णधार

एका वाहिनीशी बोलताना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना टाळत पुढील हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून आर अश्विनची निवड केली. गंभीर म्हणाला, “मी त्याच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे आणि तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. हा एक विचित्र निर्णय असू शकतो आणि फक्त मी त्याबद्दल विचार करू शकतो परंतु मी त्याला पुढील वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवू इच्छितो.”

दुसरीकडे, अश्विनबद्दल संजय मांजरेकर यांची तिखट प्रतिक्रिया आली आहे. मांजरेकरांच्या मते, अश्विनसारखा गोलंदाज आपल्या संघात असावा असे त्यांना कधीच वाटत नाही. त्याऐवजी, ते त्यांच्या संघात वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण सारखे विकेट घेणारे गोलंदाज निवडतील. ते म्हणाले, “आपण अश्विनबद्दल खूप बोलतो. टी२० गोलंदाज म्हणून अश्विन भारतीय संघासाठी योग्य नाही. तुम्हाला अश्विनच्या गोलंदाजीत बदल घडवायचा आहे तर मला असे वाटत नाही की ते घडेल. कारण तो गेल्या पाच-सात वर्षांपासून तो अशीच गोलंदाजी करत आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याच्यावर अवलंबून राहणे ठीक आहे. कारण तो एक महान कसोटी गोलंदाज आहे. परंतु, आयपीएल आणि टी२० क्रिकेटमध्ये तो तितका प्रभावी नाही.” अश्विनला चालू आयपीएल हंगामात केवळ ७ गडी बाद करण्यात यश आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---