भारत आणि पाकिस्तान या दोन देशात स्वातंत्र्यापासून कायम कटुता राहिली आहे. क्षेत्र कोणतेही असो दोघांतील तणाव कायम टोकाचाच. काश्मीर प्रश्न, दोन्ही देशांदरम्यान झालेली युद्ध ही सर्व पार्श्वभूमी पाहता दोन्ही देशात सर्वाधिक खेळला जाणारा क्रिकेट खेळ कसा या स्पर्धेपासून दूर राहणार?
दोन्ही देश जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर परस्परविरोधी उतरतात तेव्हा मैदानाला युद्धभूमीचे स्वरूप येते आणि खेळाडू बनतात सैनिक. प्रेक्षकांच्या भावनेशी आणि देशाच्या सन्मानाशी जोडलेला प्रश्न असल्याने पराकोटीचा दबाव असतो.
१९७८ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. सतरा वर्षाच्या कालावधीनंतर भारत पाकिस्तानच्या भूमीवर सामने खेळणार होता. पहिली फैसलाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दुसरी कसोटी लाहोरमध्ये होती.
त्यावेळी आतासारखे एलिट प्लेट अशा गटातील पंच नसत. जो देश मालिकेचे आयोजन करत त्याच देशातील पंच काम पाहत. तेव्हा भारत-पाकिस्तानचे संबंध पाहता, पाकिस्तानी पंच कायम पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देत. आत्ताच्यासारखी रिव्यू सिस्टिम देखील नव्हती. पंच देतील तो निर्णय मान्य करायचा आणि चालू लागायचे.
पाकिस्तानचे शकूर राणा आणि मोहम्मद खिजार हे दोघे तर आपल्या एकतर्फी निर्णयासाठी कुविख्यात होते. भारताविरुद्ध तर त्यांची प्रामाणिकता वाखाणण्याजोगी असत. भारतीय खेळाडू नाराज होण्यापलीकडे काही करू शकत नसत.
लाहोर कसोटीच्या पहिल्या डावात भारत १९९ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने जहीर अब्बास यांच्या २३५ धावांच्या जोरावर ५३९ धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानने कसोटीवर आपला शिकंजा कसला होता.
भारताचा दुसरा डाव सुरू झाला. सुनील गावस्कर आणि चेतन चौहान यांनी दमदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. हळूहळू दोघे नव्वदीत पोहोचले. आता मात्र पाकिस्तानचे धाबे दणाणले. कारण, सुनील गावसकर टिकले तर राहिलेले सर्व दिवस ते खेळून काढू शकतात हे त्यांना माहित होते.
चेतन चौहान यांना बाद देत पंचांनी आपला पहिला बळी घेतला. चौहान वैयक्तिक ९३ धावांवर बाद झाले. पण, खरे संकट गावसकर यांच्या रूपाने पाकिस्तान समोर होते. तेव्हाचे पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद मुश्ताक यांचा एक चेंडू गावसकरांच्या पॅड लागून यष्टीरक्षक सरफराजच्या हाती स्थिरावला. पाकिस्तानी खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि पंचांनी देशाच्या विरुद्ध काम न करता आपले बोट वर केले. सुनील गावस्कर ९७ धावांवर बाद.
तीन धावांनी शतक हुकल्याने गावसकर जाम वैतागले. पूर्ण दिवस ते रागात होते. रात्री भारतीय संघाला लाहोरमधील दूतावासात पार्टीसाठी आमंत्रण होते. सर्व खेळाडूंंसहित गावस्कर तेथे गेले. त्यांचा राग अजूनही गेला नव्हता.
इतक्यात त्यांचा एक मित्र ते त्यांना भेटला. तो आकडेतज्ञ होता. त्याने गावसकरांचा मूड ओळखला आणि म्हणाले, ” सकाळचा राग अजून गेलेला दिसत नाही ?”
त्यावर गावसकर म्हणाले, ” मग काय तर? सर्फराजने अपील का केले ? त्याला माहीत होते बॅटला बॉल लागलेला नाही.”
त्यावर त्या आकडेतज्ञांनी एक आकडा गावसकरांना सांगितला. त्यांनी सांगितले,
” तू नव्वदीत बाद झाला हा एक जागतिक विक्रम आहे. डॉन ब्रॅडमन यांना ५२ कसोटी आणि ८० डावात जे जमले नाही ते तू करून दाखवले.”
जास्तीत जास्त सामने खेळल्यानंतर नव्वदीत बाद होण्याचा तो विक्रम होता. पाकिस्तानी पंचाच्या त्या निर्णयामुळे गावसकरांच्या नावे अशा प्रकारचा विक्रम जमा झाला.
ब्रॅडमन यांचा विक्रम मोडल्याचे समजताच गावसकरांचा मूड बदलला ते आनंदाने नाचू लागले. लगेच त्यांनी सर्व संघ सहकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली.
अशाप्रकारे, पंचांच्या चुकीच्या निर्णयाने गावसकरांना काहीतरी फायदा होऊन ते ब्रॅडमन यांचा विक्रम मोडू शकले.
महत्त्वाच्या बातम्या –
आजवर कुणालाही न जमलेला विक्रम बुमराहच्या पदरी! वाचून गर्वाने फुगेल तुमचीही छाती
‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा
बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरेलल्या विराटने क्षेत्ररक्षण करताना लुटली मैफील, पाहा भन्नाट व्हिडिओ






