इंडोनेशियाच्या गेडे प्रियनदाना याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम केला आहे, जो आजवर कोणत्याही दिग्गज गोलंदाजालाही जमलेला नाही. बाली येथे कंबोडियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 28 वर्षीय पार्ट-टाइम वेगवान गोलंदाज गेडे प्रियनदानाने अवघ्या एका षटकात पाच विकेट घेत इतिहास रचला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात पाच बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे पुरुष आणि महिला क्रिकेटमध्येही आजवर कोणीही हा विक्रम करू शकले नव्हते.
या सामन्यात इंडोनेशियाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 167 धावा केल्या. संघाकडून सलामीवीर आणि यष्टीरक्षक धर्मा केसुमाने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद 110 धावा केल्या. प्रत्युत्तरात कंबोडियाने 15 षटकांत 5 विकेट गमावत 106 धावा केल्या होत्या आणि सामना चुरशीचा वाटत होता. मात्र 16व्या षटकात गेडे प्रियनदानाला गोलंदाजी देण्याचा निर्णय सामना पूर्णपणे बदलणारा ठरला.
प्रियनदाना या सामन्यात फलंदाजी करताना केवळ 6 धावा करून बाद झाला होता. मात्र गोलंदाजी करताना त्याने अक्षरशः थैमान घातले. षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर त्याने शाह अबरार हुसेन, निर्मलजीत सिंग आणि चानथोयून रथानक यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर एक चेंडू वाइड गेला, जो या षटकातील एकमेव धाव ठरला. पुढील दोन चेंडूंवर त्याने मोंगदारा सोक आणि पेल वेन्नक यांना बाद करत एका षटकात पाच विकेट घेण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.
या अविश्वसनीय षटकामुळे कंबोडियाचा संपूर्ण संघ अवघ्या एका धावेत 107 धावांवर गारद झाला. एका षटकात पाच विकेट, तेही केवळ एका वाइड धावेसह, हा पराक्रम क्रिकेट विश्वात दीर्घकाळ लक्षात राहणारा ठरला आहे.
यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रम लसिथ मलिंगा, राशिद खान, कर्टिस कॅम्पर आणि जेसन होल्डर यांनी केला होता. मात्र गेडे प्रियनदानाने पाच विकेट घेत सर्वांपेक्षा वेगळा इतिहास रचला आणि आपले नाव थेट विक्रमांच्या पानावर कोरले.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 4 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज
गेडे प्रियनदाना (इंडोनेशिया) – कंबोडियाविरुद्ध 2025 मध्ये 5 विकेट
लसिथ मलिंगा (श्रीलंका) – न्यूझीलंडविरुद्ध 2019 मध्ये 4 विकेट
राशिद खान (अफगाणिस्तान) – आयर्लंडविरुद्ध 2019 मध्ये 4 विकेट
कर्टिस कॅम्पर (आयर्लंड) – नेदरलँड्सविरुद्ध 2022 मध्ये 4 विकेट
जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) – इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये 4 विकेट






