रविवारी (१४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्यांदा तर न्यूझीलंड संघाने पहिल्यांदाच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली होती. आपले पहिले वहिले जेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. न्यूझीलंड संघाने दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवून दिले. यासह त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याचशा पिता आणि पुत्राच्या जोडीने देखील ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यापैकीच एक जोडी म्हणजे ज्योफ मार्श आणि मिचेल मार्श यांची. या पिता आणि पुत्राच्या जोडीने ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवणारी ही एकमेव पिता आणि पुत्राची जोडी ठरली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला १७३ धावांची आवश्यकता असताना मिचेल मार्श तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावेळी त्याने डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलसोबत महत्वाची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिले वहिले जेतेपद मिळवून दिले.
मिचेल मार्शचे वडील ज्योफ मार्श यांनी १९८७ मध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना महत्वाच्या २४ धावा केल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. तर तब्बल ३४ वर्षांनंतर मिचेल मार्शने ऑस्ट्रेलिया संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे .
ऑस्ट्रेलिया संघाचा जोरदार विजय
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील टी२० विश्वचषक अंतिम सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर मार्टिन गप्टीलने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची तर डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया ६ वा संघ; पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी