ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमान येथे टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. परंतु ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या निवड समीती प्रमुख बदलण्यात आला आहे. आता ट्रेव्हर होन्स ऐवजी जॉर्ज बेली ऑस्ट्रेलियन संघ निवडण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष असणार आहे. तो टी २० विश्वचषक आणि ऍशेस मालिकेसाठी संघ निवडणार आहेत.
जॉर्ज बेलीने तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकूण १२५ सामने खेळले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी तो निवड समितीचा एक भाग होता आणि आता त्याला मुख्य निवडकर्ता म्हणून बढती देण्यात आली आहे.
होन्स हे २१ वर्षे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सदस्य होते. या दरम्यान त्यांनी १६ वर्षे अध्यक्षपद सांभाळले होते. १९९१ ते २००५ या काळात त्यांनी पहिल्यांदा ही जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर २०१६ पासून ते आतापर्यंत ते हा पदभार सांभाळत होते.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते बनल्यानंतर जॉर्ज बेलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. बेली म्हणाला की, ‘मला ट्रेव्हर यांच्या अविश्वसनीय कार्याबद्दल आभार मानायचे आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघात खूप प्रगती झाली आहे, त्याचबरोबर संघाला यश देखील मिळाले आहे . मी एक खेळाडू आणि कर्णधार म्हणूनही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत सोबत होतो. इतके आव्हानात्मक काम असूनही, ट्रेव्हर नेहमी शांत आणि सरळ राहिले. त्यांनी माझा खेळाडूपासून निवडक पर्यंतचा प्रवासही सोपा केला. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे आणि ही जबाबदारी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे.’
निवृत्तीनंतर होन्स म्हणाला की, ‘हा खेळ माझ्यासाठी खूप चांगला झाला आहे आणि मला हा खेळ चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत आवडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या काही सर्वात यशस्वी संघांसह आणि दिग्गज खेळाडूंशी निगडीत राहण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.’
होन्स साल १९८९ मध्ये ऍशेस मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे एक सदस्य होते. मुख्य निवडकर्ता म्हणून त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियन संघाने सलग पाच ऍशेस मालिका जिंकल्या होत्या. याशिवाय १९९९ आणि २००३ मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकण्यातही संघ यशस्वी झाला होता.
त्यांचा दुसरा कार्यकाळ देखील खूप चांगला होता. यामध्ये २००१ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडमध्ये खेळल्यानंतर ऍशेजचे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला होता. आता नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून बेलीसाठी मोठी कामगिरी करणे आव्हान असेल. टी२० विश्वचषक आणि ऍशेज मालिकेसाठी संघ निवडणे ही त्याची पहिली मोठी परीक्षा असणार आहे.
बेलीने तिन्ही प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकूण १२५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३७०० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एकूण तीन शतके झळकावली आहे. बेलीने ५७ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आणि संघाला ३० सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Tokyo Olympic: ‘तब्बल ११ टाके पडूनही शौर्याने लढला,’ बॉक्सर सतीशच्या पराभवानंतर वडिलांची प्रतिक्रिया
रिषभच्या यशस्वी कारकिर्दीत विराट-रोहितचा राहिलाय महत्त्वाचा वाटा, स्वत: यष्टीरक्षकाचा खुलासा