गोवा – एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) आजच्या सामन्यात चेन्नईयन एफसीवर एकतर्फी विजय मिळवला. जॉर्ज ऑर्टिझच्या हॅटट्रिकच्या जोरावर एफसी गोवाने ५-० अशा फरकाने चेन्नईला नमवले. मागील पाच सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला नव्हता आणि अखेर त्यांनी विजयाची चव चाखली. मकान छोटे ( ६ मि.) याने गोवा संघाचे खाते उघडले. त्यानंतर जॉर्ज ऑर्टिझ ( २० मि., ४१ मि. व ५३ मि.) याने तीन गोल आणि नारायण दास ( ४५ मि.) याच्या स्वयंगोलच्या जोरावर गोवाने हा विजय मिळवला.
गोवा संघाने ६व्या मिनिटाला गोलखाते उघडून चेन्नईयन एफसीवर दडपण निर्माण केले. एडू बेडियाने आक्रमणाला सुरुवात करताना एबान डोहलिंगला पास दिला. डोहलिंगने चेंडू बॉक्समध्ये घेऊन जाताना मकान छोटेकडे तो सोपवला आणि त्यावर छोटेने व्हॉलीव्दारे गोल करून गोवाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गोवाचे खेळाडू आज चांगल्या फॉर्मात दिसले आणि त्यांच्याकडून सातत्याने आक्रमण होताना दिसले. त्याचे फळ त्यांना २०व्या मिनिटाला मिळाले आणि जॉर्ज ऑर्टिझच्या गोलने गोवाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्यातून चेन्नईयनचे खेळाडू काही शिकताना दिसले नाही.
४१व्या मिनिटाला त्यांच्या मध्यरक्षकांनी पेनल्टी क्षेत्रातच चूक केली आणि ऑर्टिझने मौके पे चौका मारताना गोवा संघासाठी तिसरा गोल केला. चेन्नईयनच्या अडचणीत आणखी वाढ झाली. अल्बेर्टो नोग्युराचा क्रॉस अडवण्यासाठी चेन्नईयनच्या नारायण दासने हेडरचा प्रयोग केला, परंतु चेंडू गोलजाळीत विसावला आणि गोवाने पहिल्या हाफमध्ये ४-० अशी दणदणीत आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये गोवा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यांच्याकडून ४ ऑन टार्गेट प्रयत्न झाले, तर चेन्नईयनला त्यांनी एकही प्रयत्न करू दिला नाही.
दुसऱ्या हाफमध्ये चेन्नईयनने दोन बदल केले आणि ४८व्या मिनिटाला ते चेंडू घेऊन गोवाच्या पेनल्टी क्षेत्रात घुसले होते. पण, गोवाचा बचावही तितकाच भक्कम दिसला आणि चेन्नईयनला ६ यार्डावरूनही गोल करता आला नाही. ५०व्या मिनिटाला ऑर्टिझ पुन्हा चेन्नईयनच्या बचावपटूंना चकवून गोल करण्यासाठी पुढे गेला, परंतु त्याला शॉर्ट ऑन टार्गेट ठेवता आला नाही. ५३व्या मिनिटाला गोवाकडून आणखी एक जबरदस्त आक्रमण झालेले पाहायला मिळाला. पण, काही सेंकदातच ऑर्टिजने आजच्या सामन्यातील हॅटट्रिक पूर्ण करताना गोवाची आघाडी ५-० अशी मजबूत केली. इथून चेन्नईयनला पुनरागमन करणे अवघडच होते. गोवा संघाने हा सामना ५-० असा जिंकला.
निकाल – एफसी गोवा ५ ( मकान छोटे ६ मि., जॉर्ज ऑर्टिझ २० मि., ४१ मि. व ५३ मि., नारायण दास ४५ मि. स्वयंगोल ) विरूद्ध चेन्नईयन एफसी ०.