टी20 विश्वचषक 2024 चा 24 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियानं नामिबियावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात नामिबियाच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली. कर्णधार गेरहार्ड इरास्मसशिवाय इतर फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात नामिबियाच्या कर्णधाराच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. हा असा विक्रम आहे, जो कोणालाही अजिबात लक्षात ठेवायला आवडणार नाही.
अँटिग्वाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला नामिबियाचा निम्मा संघ केवळ 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मसनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 43 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 36 धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान इरास्मसनं आपलं खातं उघडण्यासाठी तब्बल 17 चेंडू घेतले. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजानं आपल्या पहिल्या धावा करण्यासाठी 17 चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे गेरहार्ड इरास्मसच्या नावावर हा लज्जास्पद विक्रम नोंदवला गेलाय.
या सामन्यात नामिबियाचा संपूर्ण संघ 17 षटकांत अवघ्या 72 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू ॲडम झाम्पानं शानदार गोलंदाजी केली. त्यानं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 12 धावा देऊन 4 बळी घेतले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं.
73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंना अजिबात अडचण आली नाही. त्यांनी पॉवरप्लेमध्येच धावांचा पाठलाग पूर्ण केला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं 8 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडनं 17 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 34 धावांची खेळी केली. कर्णधार मिचेल मार्शनंही 9 चेंडूत 18 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियानं 73 धावांचं लक्ष्य अवघ्या 5.4 षटकांत गाठलं.
महत्त्वाच्या बातम्या –
कोण आहे पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा ॲरॉन जॉन्सन? कॅनडाच्या खेळाडूबद्दल मनोरंजक गोष्टी जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाची सुपर 8 मध्ये धडक! ट्रॅव्हिस हेडचा आयपीएलमधील फॉर्म जारी, पॉवरप्लेमध्ये रचला इतिहास
पावसामुळे नेपाळ-श्रीलंकेची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये दाखल