लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात कोलंबो किंग्स संघ चांगला खेळ दाखवित आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी पूर्ण झाली आहे. यावेळी कोलंबोने ८ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले. आता, पहिल्या उपांत्य सामन्यात किंग्सचा संघ गॉल ग्लेडिएटर्सशी खेळेल. पण, याआधी त्यांच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक हर्शल गिब्स वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा देत मायदेशी रवाना झाला आहे.
कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याने गिब्सने सोडले पद
प्रथमच आयोजित होत असलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये गिब्स ऍन्जलो मॅथ्यूज नेतृत्व करत असलेल्या कोलंबो किंग्सला मार्गदर्शन करत होता. किंग्सने साखळी फेरीतील ८ पैकी ६ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्याआधी गिब्सने मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गिब्सची आई आणि भाऊ यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. सोबतच, त्याची बहीण देखील याच आजारातून बरी होतेय. अशा परिस्थितीत, गिब्सने लंका प्रीमिअर लीगमधील आपले काम सोडून दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा निर्णय घेतला.
कर्णधार आणि संघमालकाने केली पुष्टी
कोलंबो किंग्सचा कर्णधार ऍन्जेलो मॅथ्यूज आणि संघ मालकांनीही याची पुष्टी केली आहे की, गिब्स तातडीने राजीनामा देऊन दक्षिण आफ्रिकेला गेला आहे. मॅथ्यूजने सांगितले, ‘संघ मालकांनी आम्हाला कळवले आहे की, गिब्स आता संघाचा भाग नाही. तो मायदेशी गेला आहे.’
त्यानंतर गिब्सने कोलंबो संघाचे संघमालक धनुष्का अरविंदा यांच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले,’आई आणि भाऊ कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि बहीण देखील याच आजारातून सावरत असल्याने, मला घरी जावे लागले.’
आज (१३ डिसेंबर) कोलंबो किंग्स पहिल्या उपांत्य सामन्यात गॉल ग्लेडिएटर्सशी भिडेल. हा सामना हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियमवर होईल.
संबंधित बातम्या:
– लंका प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात कोलंबो किंग्जचा कॅंडी टस्कर्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय
– आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरलेला रसेल गाजवतोय लंका प्रीमियर लीग; ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक
– आमिरची भेदक गोलंदाजी, ठरला लंका प्रीमियर लीगमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू