क्रिकेट इतिहासामध्ये असे बरेच फटकेबाज फलंदाज आहेत जे मैदानात येताच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतात. सध्या एबी डिव्हिलियर्स, कायरन पोलार्ड, जोस बटलर, हार्दिक पंड्या हे खेळाडू या बाबतीत तरबेज मानले जातात. मात्र या प्रकारातील पहिले धडाकेबाज फलंदाज म्हणजे इंग्लंडचे गिल्बर्ट जेसप होत.
ज्यावेळेस जेसप त्यांच्या लयीत असत, त्यावेळी मोठ्या मोठ्या गोलंदाजांचे चेहरे पाहण्यासारखे होत. आपणास आश्चर्य वाटेल की आज जेसप यांचा उल्लेख का केला जात आहे? कारण, काल जेसप यांची जयंती होती. त्यांचा जन्म १९ मे १८८४ रोजी ग्लॉस्टरशायर, इंग्लंड येथे झाला होता. त्यांनी इंग्लंडकडून जास्त सामने खेळले नाहीत. परंतु प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जेसप यांनी अफलातून कामगिरी करून दाखवली.
त्या दोन ऐतिहासिक खेळ्या
गिल्बर्ट जेसप यांनी वयाच्या २० व्या वर्षी ग्लॉस्टरशायरकडून खेळायला सुरुवात केली. गिल्बर्ट यांनी कारकिर्दीत ४९३ प्रथमश्रेणी सामने खेळले. त्यांनी ५३ शतके आणि १७ अर्धशतकांच्या मदतीने २६६९८ धावा केल्या. मात्र, त्यांनी खेळलेल्या दोन आश्चर्यकारक खेळ्या कायम स्मरणात राहतील अशा आहेत, ज्यांची अजूनही चर्चा केली जाते. त्यांनी यॉर्कशायरविरुद्ध ४० मिनिटांत १८९७ साली शतक झळकावलेले. हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे वेगवान (मिनिटानुसार) शतकही आहे.
त्याशिवाय, गिल्बर्ट यांनी दोन तासांत म्हणजेच १२० मिनिटांत दुहेरी शतक झळकावण्याचा पराक्रमही केला होता. त्यांनी हे द्विशतक १९०३ मध्ये ससेक्स विरुद्ध २८६ धावांची खेळी करताना केले होते. त्यांच्या प्रथमश्रेणी कारकीर्दीतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. सर्वात कमी मिनिटांत द्विशतक ठोकण्याच्या बाबतीत जेसप अजूनही संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्लायव्ह लॉईड यांनी देखील १२० मिनिटांत दुहेरी शतक झळकावले होते. १९७६ मध्ये त्यांनी ग्लॅमॉर्गनविरुद्ध नाबाद २०१ धावा चोपल्या होत्या.
अशी राहिली कारकीर्द
गिल्बर्ट जेसप यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी इंग्लंडकडून १८ कसोटी सामने खेळले आणि त्यात ५६९ धावा केल्या होत्या. या काळात त्यांनी केवळ एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली होती. १८९९ मध्ये इंग्लंडसाठी त्यांनी पहिली कसोटी खेळली होती. गिल्बर्ट यांनी शेवटची कसोटी १९१३ मध्ये खेळली होती. गिल्बर्ट यांनी आपले एकमेव शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले होते. २६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ४८ धावांत चार बळी गमावले होते. त्यावेळी फलंदाजीला येत त्यांनी केवळ ७७ मिनिटांमध्ये १०४ धावांची वादळी खेळी केली होती. इंग्लंडने हा सामना अखेरचा गडी राखत आपल्या नावे केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये एकाच षटकात ५ खणखणीत षटकार ठोकत प्रकाशझोतात आलेला ‘राहुल तेवतिया’