-आदित्य गुंड (@AdityaGund)
पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र ओपन स्पर्धेच्या जाईल्स सिमॉन विरुद्ध केविन अँडरसन या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल एक मजेदार प्रसंग घडला. भारतीय लोक आणि त्यांचं बुलेट प्रेम जगजाहीर आहे. अनेक हौशी लोक आपली गाडी आली आहे हे जगाला कळण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवत असतात. कोणी भगवा झेंडाच लावतो, कोणी रंगच वेगळा घेतो,कुणी विचित्र हॉर्न लावून घेतात, कुणी गाडीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज येईल अशी व्यवस्था करून घेतो.
असाच एक ध्वनी प्रदूषणावर ठाम विश्वास असलेला बुलेटमालक काल बालेवाडी क्रीडासंकुलात आला.सामने सुरू आहेत हे गावीही नसलेल्या त्याने नेहमीप्रमाणे जोरदार आवाज येईल अशा रितीने आपली बुलेट दामटली.कोर्टवरील प्रेक्षकांच्या थोड्या आवाजाने देखील लक्ष खेळाडूंचे विचलित होत असते. म्हणूनच पॉईंट सुरू झाला की तो संपेपर्यंत प्रेक्षकांनी शांत राहणे अपेक्षित असते.
अँडरसनविरुद्धच्या सामन्यात सर्व्हिस करत असताना अचानक आलेल्या या बुलेटच्या आवाजाने सिमॉन गोंधळून गेला.त्याने खेळ थांबवून पंचाकडे पाहिले. मात्र गाडीचा आवाज बाहेरून येत असल्याने त्याची काहीही मदत करण्यास पंचांनी असमर्थता दाखवली. या छोट्याशा प्रकारामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये मात्र हास्याची लकेर उमटली.
महत्त्वाच्या बातम्या:
–केएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ
–Video: जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्रकार परिषदेत बोलतो पत्रकाराच्याच फोनवर…
–टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन