भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेतील शेवटच्या सामन्यात आपले पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी सोबतच फलदाजीत देखील उत्तम कामगिरी केली.
या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे. अशातच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सुंदरला ब्रिस्बेन येथे खेळवणे एक मोठा धाडसी निर्णय असल्याचे म्हंटले आहे.
एका मुलाखतीदरम्यान अरुण म्हणाले, “शेवटच्या कसोटी सामन्यात एका अतिरिक्त फलंदाजाला खेळवण्याबाबत चर्चा सुरू होती, मात्र नंतर आम्ही हा निर्णय रद्द करण्याचे ठरवले. जास्त फलंदाजांना खेळवणे हा एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. आम्ही पाच गोलंदाजांसह उतरण्याचे ठरवले. संपूर्ण माहिती असतानाही हा एक धाडसी निर्णय होता व त्याचा चांगला परिणाम सगळे लोकं बघतच आहेत.”
सुंदरने ब्रिस्बेन येथे आपले कसोटी पदार्पण करताना उत्तम कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले तसेच, भारताच्या पहिल्या डावात शानदार 62 धावांची खेळी केली. सुंदरने शार्दुल ठाकुर सोबत सातव्या विकेटसाठी 123 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही सुंदरने एक बळी मिळविला होता. सुंदरचे भारताच्या दुसऱ्या डावातील आत्मविश्वासपूर्ण खेळीने विशेष कौतुक झाले. भारताच्या दुसऱ्या डावात अतिशय महत्त्वाच्या क्षणी त्याने 22 धावांची खेळी करत संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या आठवणीत हार्दिक पंड्या झाला भावूक, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ
तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहे, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया