---Advertisement---

मार्केटमध्ये ‘मॅक्स’ भाऊचा दरारा कायम.! मॅक्सवेलवर १४.२५ कोटींची विक्रमी बोली, ‘या’ संघाने घेतले ताफ्यात

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 3:39 PM
---Advertisement---

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ च्या लिलावाला चेन्नई येथे सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून या लिलावाची क्रिकेटप्रेमीं जोरदार चर्चा होती. या लिलावात तब्बल २९८ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपले नशीब आजमतील. या लिलावातपूर्वी अनेकांनी अंदाज लावल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मोठ्या किमतीत विकला गेला आहे.

या संघात खेळणार मॅक्सवेल

आयपीएल लिलावापूर्वी सर्वात जास्त चर्चा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याची झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेला मॅक्सवेल मोठी रक्कम मिळूनही दरवर्षी आयपीएलमध्ये अपयशी ठरत आहे. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल १४ कोटी २५ लाख कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मॅक्सवेलची बोली २ कोटी रुपयांपासून सुरु झाली होती. राजस्थान व कोलकाता यांनी बोलीची सुरुवात केल्यानंतर आरसीबी आणि सीएसके संघांनी मॅक्सवेलची बोली पुढे नेली. अखेरीस, चेन्नईने माघार घेतल्याने तो संघाचा भाग झाला.

मागील हंगामात राहिला होता अपयशी

ग्लेन मॅक्सवेल गत हंगामात पूर्णपणे अपयशी ठरला होता. किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना त्याने १३ सामन्‍यात फक्‍त १०८ धावा केल्या होत्या. विशेष, म्हणजे यात तो एकही षटकार मारू शकला नव्हता. पंजाबने त्यावर तब्बल १०.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

आयपीएलचा अनुभव आहे मॅक्सवेलकडे

ऑस्ट्रेलियासाठी चौकार षटकारांची आतषबाजी करणारा व उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी करणारा मॅक्सवेल आयपीएलमधील एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०१३ आयपीएल मुंबई इंडियन्स संघाने त्याच्यावर मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केले होते. तत्पूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. २०१४ साली किंग्स इलेव्हन पंजाब संघात सामील झाल्यापासून तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. २०१७ मध्ये त्याने पंजाबचे नेतृत्व देखील केले. मात्र, कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१८ आयपीएल वेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग झाला. २०१९ मध्ये त्याने विश्रांतीचा निर्णय घेतल्यानंतर २०२० मध्ये पुन्हा आपल्या पूर्वीच्या पंजाब संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---