रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच वाईट राहिला आहे. संघानं 6 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळालाय. या हंगामात फक्त एकच विजय मिळवणारा बंगळुरू हा एकमेव संघ आहे. संघ गुणतालिकेत तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. आता या कठीण परिस्थितीत आरसीबीला आणखी एक मोठा धक्का बसला. टीमचा स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी झाला आहे.
‘बिग शो’ या नावानं ओळखला जाणारा आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मॅक्सवेलला दुखापत झाली होती. आकाश दीपच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना मॅक्सवेलच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर तो मैदानाबाहेर गेला. बंगळुरूचा पुढील सामना 15 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. आता मॅक्सवेल या सामन्यातून बाहेर पडू शकतो.
मॅक्सवेलनं या मोसमात आतापर्यंत 6 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये तो 3 वेळा शून्यावर बाद झालाय. याशिवाय, उर्वरित तीन डावांमध्ये त्यानं 3, 28 आणि 1 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्यानं 4 बळी घेतले आहेत. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही मॅक्सवेलचा फ्लॉप शो जारी आहे. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. मात्र त्यानं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 3 झेल सोडले आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात बंगळुरूनं अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं होतं. आता मॅक्सवेल बाहेर गेल्यानंतर हैदराबादविरुद्ध कॅमेरून ग्रीनला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. आरसीबीसी मधली फळी मॅक्सवेलवर अवलंबून आहे. तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. मात्र तो धावा करत नसल्यामुळे संघाची मधली फळी पूर्णपणे निष्फळ ठरत आहे. यामुळे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या दिनेश कार्तिकवर दबाव वाढतोय. आता अशा परिस्थितीत तो बाहेर गेल्यानंतर कॅमरून ग्रीनला आरसीबीच्या मधल्या फळीची जबाबदारी घ्यावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
गुणतालिकेत तळाशी असलेली आरसीबी अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते का? जाणून घ्या
मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी एकत्र दिसले सचिन, धोनी आणि रोहित! नक्की काय शिजतंय?