संपूर्ण क्रिकेटजगताला सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. ९ एप्रिल पासून भारतातील वेगवेगळ्या शहरात आयपीएलचा महासंग्राम रंगणार आहे. चेन्नई येथे गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात यंदाचा सलामीचा सामना होणार आहे. तत्पुर्वी आजी-माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या आयपीएल संघातील उत्कृष्ट ११ खेळाडूंची निवड करताना दिसत आहे.
यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) नवोदित शिलेदार ग्लेन मॅक्सवेल यानेही उडी घेतली आहे. त्याने त्याचा सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे. चला तर पाहूया, मॅक्सवेलने त्याच्या संघात कोणकोणत्या खेळाडूला स्थान दिले आहे?
विराट, वॉर्नरला सलामीला संधी
अष्टपैलू मॅक्सवेलने डावाची सुरुवात करण्यासाठी आपला संघ सहकारी आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरच्या टी२० सामन्यात विराटने रोहित शर्मासोबत मिळून सलामीला फलंदाजी केली होती. यावेळी त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी केली होती. कदाचित याच खेळीला पाहता मॅक्सवेलने विराटला सलामीला निवडले असावे.
विराटबरोबर दुसरा सलामीवीर म्हणून मॅक्सवेलने सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला निवडले आहे. वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट सलामीवीरांपैकी एक आहे.
सलामीवीरांनतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याने आरसीबीचा धाकड फलंदाज एबी डिविलियर्सला संधी दिली आहे. तर मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला चौथ्या क्रमाकांवरील फलंदाज म्हणून घेतले आहे.
धोनीला निवडले यष्टीरक्षक फलंदाज
मॅक्सवेलच्या अंतिम ११ जणांच्या पथकात मधल्या फळीची जबाबदारी स्वत मॅक्सवेलच सांभाळणार आहे. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा धाकड फलंदाज आंद्रे रसलला सोबतीला घेतले आहे. क्रिकेटविश्वातील महान यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक असणारा चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनीला मॅक्सवेलने आपल्या संघाचा यष्टीरक्षक निवडले आहे.
गोलंदाजी विभागात अनुभवींचा भरणा
फलंदाजीनंतर गोलंदाजी विभागात मॅक्सवेलने अधिकतर अनुभवी खेळाडूंची निवड केली आहे. यंदा कोलकाता नाईट राटडर्सचा भाग असलेला हरभजन सिंग हा मॅक्सवेलच्या संघातील एकमेव फिरकी गोलंदाज आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये मोहीत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना जागा मिळाली आहे.
रोहित शर्माला नाही दिले स्थान
आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएलच्या श्रेयस्कर फलंदाजांपैकी एक असलेला रोहित शर्माला मॅक्सवलेने निवडलेले नाही. आयपीएलमध्ये फलंदाजीतील मोठमोठे विक्रम नावावर असूनही विस्फोटक फलंदाज रोहितवर त्याने दुर्लक्ष केले आहे.
ग्लेन मॅक्सवेलची आयपीएल प्लेइंग इलेव्हनः
डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, सुरेश रैना, ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हरभजन सिंग, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ मधील राखीव खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन पाहिलीत का? सगळेच आहेत शेरास सव्वाशेर
बाबा नको ना जाऊ! आयपीएल वारीला निघताना वॉर्नरची लेक गळ्याला पडून ढसाढसा रडली; पाहा तो क्यूट क्षण
भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण