दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था वाईट दिसत आहे. 15 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबी गुणतालिकेत तळाशी आहे. संघानं 7 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे.
आता आयपीएलच्या मध्यावर आरसीबीला आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं मानसिक थकव्याचं कारण पुढे करत आयपीएलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतलाय. मॅक्सवेलनं आरसीबी व्यवस्थापनाकडे ‘मानसिक आणि शारीरिक विश्रांतीची विनंती केली, जी मान्य करण्यात आली.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर मॅक्सवेल म्हणाला, “माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हा निर्णय खूप सोपा होता.” मॅक्सवेलनं सांगितलं की, आरसीबीच्या पराभवानंतर, तो फाफ डु प्लेसिस आणि प्रशिक्षकांकडे गेला आणि सांगितलं की कदाचित आता माझ्याऐवजी दुसऱ्याला आजमावण्याची वेळ आली आहे. तो म्हणाला की, त्याला मानसिक आणि शारीरिक विश्रांती घेण्याची गरज आहे.
मॅक्सवेल पुढे म्हणाला, “आयपीएलच्या या हंगामात मला जाणवलं की मी बॅटनं संघासाठी योगदान देत नाहीये. पॉइंट टेबल मध्येही आमची स्थिती काही फार चांगली नाही. मला वाटतं की दुसऱ्या खेळाडूला आपला खेळ दाखवण्याची ही चांगली संधी आहे. याद्वारे कोणीतरी संघात आपली जागा बनवू शकतो.”
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2024 मध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्यानं या हंगामात खेळलेल्या सहा डावांमध्ये 5.33 च्या सरासरीनं केवळ 32 धावा केल्या आहेत. या आधी तो अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता या मागचं खरं कारण समोर आलंय.
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मॅक्सवेल जबरदस्त फॉर्ममध्ये होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून त्यानं 17 टी20 सामन्यांमध्ये 42.46 ची सरासरी आणि 185.85 च्या स्ट्राइक रेटने 552 धावा केल्या होत्या. या काळात त्यानं दोन शतकंही झळकावली होती. आयपीएलच्या या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तेव्हापासून तो दोनदा शून्यावर आऊट झाला आहे. तो फक्त एकदाच पाच चेंडूंपेक्षा जास्त खेळला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मॅक्सवेलनं 19 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. या सामन्यातही त्याला दोन वेळा जीवनदान मिळालं होतं.
आयपीएल 2022 पूर्वी आरसीबीनं मॅक्सवेलला 11 कोटींना रिटेन केलं होतं. 2021 च्या हंगामात त्यानं आरसीबीसाठी 15 सामन्यात 144.10 च्या स्ट्राइक रेटनं 513 धावा ठोकल्या होत्या. 2020 च्या आयपीएल हंगामात मॅक्सवेल पूर्णपणे आऊट ऑफ फॉर्म होता. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्यानं 11 डावात 15.42 ची सरासरी आणि 101.88 च्या स्ट्राईक रेटनं केवळ 108 धावा केल्या होत्या. त्यावर्षी त्याला एकही षटकार मारता आला नव्हता.
मॅक्सवेलची आयपीएलमधील कामगिरी
फलंदाजी : 130 सामने, 2751 धावा, 25.24 सरासरी, 156.40 स्ट्राइक रेट, 46 झेल
गोलंदाजी : 130 सामने, 35 बळी, सर्वोत्तम गोलंदाजी: 2/15, सरासरी 35.71, इकॉनॉमी 8.31
महत्त्वाच्या बातम्या –
“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला
दिनेश कार्तिक, रिंकू सिंह की हार्दिक पांड्या? टी20 विश्वचषकात कोण असेल टीम इंडियाचा फिनिशर?