भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर चांगले प्रदर्शन करत आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असेल्या टी२० मालिकेत त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे आणि आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत त्याला संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे आयर्लंड दौऱ्यात नेतृत्वाची जबाबदारी हार्दिककडे आली आहे. अशात ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राने हार्दिकचे कौतुक केले आहे आणि त्याला स्वतःची भूमिका चांगल्या प्रकारे माहिती असल्याचेही सांगितले.
चेन्नईमध्ये एका पत्रकार परिषदेत ग्रेन मॅकग्रा (Glenn McGrath) बोलत होते. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) विषयी ते म्हणाले की, “हार्दिककडे आता एवढा अनुभव आहे की, त्याला माहिती आहे, त्याला काय करायचे आहे. प्रशिक्षकांनी त्याला सांगायची काहीच गरज नाहीये की, त्याला काय कारायचे आहे. तो एक गुणवंत अष्टपैलू आहे आणि चांगला हिटर देखील आहे. काही सामन्यात चांगला चारतो, तर काही सामन्यात नाही. पण हार्दिकला माहिती आहे की, त्याला काय करायचे आहे.”
दरम्यान, हार्दिक पंड्याने मागच्या वर्षी टी२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळाची विश्रांती घेतली होती. विश्वचषकात फिटनेसच्या कारणास्तव त्याला गोलंदाजी देखील करत आली नव्हती. विश्रांतीच्या काळात त्याने स्वतःच्या फिटनेसवर मेहनत घेतली आणि आयपीएल २०२२ मध्ये जोरदार पुनरागमन केले. गुजरात टायटन्सला त्याने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद पटकावून दिले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्या सुरु असेल्या मालिकेत देखील त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. पहिल्या सामन्यात हार्दिकने १२ चेंडूत ताबडतोड ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ९ धावांवर समाधान मानले, पण तिसऱ्या सामन्यात २१ चेंडूत पुन्हा एकदा नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. त्याने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या धावा संघासाठी नक्कीच महत्वाच्या ठरल्या. गोलंदजीत मात्र त्याला कसलीही कमाल करता आली नाही.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताला आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे. आयर्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना २६ जून, तर दुसरा सामना २८ जून रोजी खेळला जाणार आहे. यादरम्यान भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘या’ बाबतीत इंग्लंडला भरावा लागलाय सर्वात जास्त दंड, भारतही काही मागे नाही
भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण