शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये रांची येथे दुसरा टी२० सामना पार पडला. हा सामना जिंकत यजमान भारतीय संघाला मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याची संधी होती. तर दुसरीकडे पाहुणा न्यूझीलंड संघ पुनरागमन करत मालिका १-१ ने बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील दिसला. परंतु नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांना विशेष प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी निर्धारित २० षटकअखेर ६ विकेट्स गमावून केवळ १५३ धावा केल्या. दरम्यान न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन फिलिप्स याने आपल्या छोटेखानी पण प्रभावी खेळीसह एक विक्रम केला आहे.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत फिलिप्सने १६१ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने २१ चेंडूंमध्ये ३४ धावांची उपयुक्त खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चौफेर फटकेबाजी करत १ चौकार आणि ३ खणखणीत षटकारही खेचले. या ३ षटकारांसह त्याने टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या विशेष फलंदाजांच्या यादीत आपल्या नावाची भर घातली आहे.
भारतीय गोलंदाज दिपक चाहर, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी १ षटकार मारत त्याने वर्ष २०२१ मध्ये तब्बल ९७ षटकारांचा आकडा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटव्यतिरिक्त त्याने आयपीएल आणि सीपीएल या टी२० लीगमध्ये मिळून हे षटकार ठोकले आहेत.
एका वर्षात टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रमात वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंचा बोलबाला राहिला आहे. ख्रिस गेल सर्वाधिक १३५ षटकारांसह या विक्रमांत अव्वलस्थानी आहे. त्याने २०१५ मध्ये इतके षटकार मारले होते. त्याच्याखेरीज आंद्रे रसेल आणि कायरन पोलार्ड यांनीही टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात ९५ पेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
कौतुकास्पद बाब अशी की, वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंना वगळल्यास केवळ न्यूझीलंडच्या फिलिप्सने टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार:
१३५ – ख्रिस गेल २०१५
१२१ – ख्रिस गेल २०११
११६- ख्रिस गेल २०१२
११२- ख्रिस गेल २०१६
१०१ – ख्रिस गेल २०१७
१०१- आंद्रे रसेल, २०१९
१०० – ख्रिस गेल, २०१३
९७ – ग्लेन फिलिप्स, २०२१
९६ – कायरन पोलार्ड, २०१९
महत्त्वाच्या बातम्या-
ग्रीनपार्कवर भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य; पहिल्या कसोटीपूर्वी आयोजक चिंतीत
सिराजची दुखापत पडली पथ्यावर, वयाच्या तिशीत ‘या’ वेगवान गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण