भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. टी२० मालिकेनंतर दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळली जाईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानामध्ये खेळला जाणार आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये खेळाडूंना आतंकवाद्यांपासून धोका असल्याचे पाहिले गेले आहे, पण ग्रीनपार्क स्टेडियमवर हा धोका नसून, भटक्या कुत्र्यांचा धोका आहे. आजपर्यंत या मैदानावर खेळलेल्या बहूतांश सामन्यांदरम्यान मोकाट कुत्रे मैदानावर आलेले आहेत.
टी२० मालिकेनंतर २५ नोव्हेंबर पासून ग्रीन पार्कवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील या भटक्या कुत्र्यांची मैदानात दिसण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, या सामन्यापूर्वी जवळपास ६-७ कुत्र्यांच्या एका टोळीला मैदानावर फिरताना पाहिले गेले आहे. हा सामना तोंडावर आलेला असताना, या कुत्र्यांना अडवण्यासाठी ग्रीन पार्क प्रशासनाकडून अद्याप कसलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. आता या आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी या कुत्र्यांची व्यवस्था करणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, बुधवारपासून ग्रीन पार्क मैदान पिच सुरक्षा वाल्यांच्या हवाले करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या कुत्र्यांची व्यवस्था झालेली दिसत नाही.
ग्रीन पार्क स्टेडियममध्ये कुत्र्यांना मैदानात घुसण्यापासून कोणीच अडवू शकलेले नाही. या स्टेडियमचा इतिहास पाहिला गेला तर, याठिकाणी आजपर्यंत जेवढे सामने खेळले गेले आहेत, त्यामध्ये जवळपास सर्वच सामन्यात हे कुत्रे मैदानावर घुसलेले आहेत. अनेकदा या कुत्र्यांमुळे सामना काही वेळासाठी थांबवावा लागलेला आहे. या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील हे कुत्रे आकर्षणाचे केंद्र ठरतात.
या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मागच्या सामन्यात या कुत्र्यांना मैदानात घुसू नये यासाठी पोलीस कर्मचारी तैनात केले गेले होते. मात्र, पोलीसांना तैनात करूनदेखील काही फायदा झाला नव्हता, कुत्रे या सामन्यात मैदानावर आले होते.
तत्पूर्वी, एक आठवड्यांपूर्वी यासंदर्भात नगर परिषदेकडे स्टेडियमजवळील या भटक्या कुत्र्यांबाबत पत्राद्वारे तक्रार केली गेली आहे. मात्र, अद्याप नगरपरिषदेकडून याबाबत काही निर्णय किंवा हालचाल झालेली दिसत नाही. अशात २५ नोव्हेंबरपासून या मैदानावर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कुत्र्यांना मैदानात जाणापासून रोखले जाते की नाही, हे पाहावे लागणार आहे.