एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात धडाकेबाज खेळासह आपली मोहिम पुन्हा विजयी मार्गावर आणली. शुक्रवारी गोव्याने फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचा 5-1 असा धुव्वा उडविला. याबरोबरच गोव्याने गुणतक्त्यात पाचवरून दोन क्रमांक आगेकूच करीत तिसरे स्थान गाठले. गोव्याने सर्व गोल उत्तरार्धात केले. स्पेनचा दमदार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने खाते उघडण्यासह दोन गोलांचे योगदान दिले. एदू बेदिया, ह्युगो बौमौस व मिग्युएल फर्नांडेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला.
नॉर्थइस्टची मदार बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर होती, पण त्याला 90व्या मिनिटास एकच गोल करता आला. गोव्याच्या बचाव फळीने आपली जबाबदारी चोख पार पाडली. दुसरीकडे नॉर्थइस्टची बचाव फळी कोरोला रोखू शकली नाही. गोल्डन बूट किताबाच्या शर्यतीत कोरोने दहा गोलांसह आघाडी घेतली.
गोव्याची गेल्या तीन सामन्यांत बेंगळुरूकडून हार, एटीकेशी गोलशून्य बरोबरी, तर एफसी पुणे सिटीकडून हार अशी धक्कादायक कामगिरी झाली होती. घरच्या मैदानावरील यशासह सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने आपली मोहीम पुन्हा विजयी मार्गावर आणली. दुसरीकडे नॉर्थइस्टला तीनवरून चौथ्या क्रमांकावर घसरावे लागले.
गोव्याने 11 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून दोन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. गोव्याने जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 19) आणि नॉर्थइस्ट यांना मागे टाकले. नॉर्थइस्टला 12 सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला. आधीच्या तीन सामन्यांत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पाच विजय व पाच बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण आहेत, जे गोव्याइतकेच आहेत, पण नॉर्थइस्टचा गोलफरक 2 (16-14) आहे, तर गोव्याचा 10 (27-17) असा सरस आहे. बेंगळुरू एफसी (11 सामन्यांतून 27) आघाडीवर आहे, तर मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 21) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गोव्याला खाते उघडण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिक्षा करावी लागली, जी कोरोने संपुष्टात आणली. ह्युगो बौमौस याने ही चाल रचली. त्याने उजवीकडे जॅकीचंद सिंग याला पास दिला. जॅकीचंदने कोरोला अप्रतिम पास दिला. मग कोरोने उजव्या पायाने चेंडूला नेटची दिशा दिली. कोरोने जवळून मारलेल्या अचूक फटक्यावर नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार निरुत्तर झाला.
दहा मिनिटांनी ह्युगोने बेदीयाला चेंडूसह मोकळीक दिली. त्यावेळी पवन मैदानावर पडला होता. त्यामुळे बेदीयाने त्याच्यावरून चेंडू सहज नेटमध्ये मारला. दोन मिनिटांनी ब्रँडन फर्नांडीस याने उजवीकडून चाल रचत बॉक्सपाशी ह्युगोला पास दिला. ह्युगोने मग डाव्या पायाने चेंडूला नेटची दिशा दिली. त्यानंतर स्थानिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मग कोरो आणि त्यानंतर भरपाई वेळेत मिग्युएल यांनी गोल करीत गोवेकर फुटबॉलप्रेमींना पर्वणी दिली.
गोव्याने सुरवात चांगली केली. गोव्याच्या ह्युगो बौमौस याने दुसऱ्याच मिनिटाला उजवीकडून मुसंडी मारली. त्याने डावीकडील जॅकीचंद सिंगला पास दिला. बॉक्समधून जॅकीचंदने मारलेला फटका मात्र फार स्वैर होता.
नॉर्थइस्टला पाचव्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. जुआन मॅस्कीया याने लांबून प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू गोव्याच्या एका खेळाडूला लागून बाहेर गेला. कॉर्नरवर फेडेरिको गॅलेगोने चेंडू मारला. हा चेंडू पुन्हा गॅलेगोकडे मारण्यात आला. त्याने उजव्या पायाने मारलेला क्रॉस शॉट गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने सहज अडविला. याचे कारण चेंडू त्याच्या अगदी जवळून मारला गेला.
दहाव्या मिनिटाला गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडीसने मध्य रेषेपाशी उजवीकडे चेंडू मिळताच घोडदौड सुरु केली. नॉर्थइस्टच्या मॅटो ग्रजिच याने मैदानावर घसरत त्याला रोखले. पाच मिनिटांनी ब्रँडन फर्नांडीसने ह्युगोला अप्रतिम पास दिला. डावीकडे बॉक्सपाशी ह्युगोला भरपूर संधी होती. त्याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण त्यावेळी गोव्याचा फेरॅन गोरोमीनास किंवा मौर्तडा फॉल यांच्यापैकी कुणीच ही संधी साधू शकले नाही. त्यामुळे चेंडू बाहेर गेला.
मॅस्कीयाला 21व्या मिनिटाला बॉक्सलगत चेंडू मिळाला. त्याने त्यावर फटका मारायचा प्रयत्न केला. ते शक्य नसल्यामुळे त्याने गॅलेगोला पास दिला. गॅलेगोने मारलेला फटका ताकदवान होता, पण त्यात अचूकता नव्हती.
जॅकीचंदने 23व्या मिनिटाला पास देताच कोरोने डाव्या पायाने मारलेला चेंडू बाहेर जाण्याची शक्यता होती, पण ह्युगोने तो नेटमध्ये आरामात मारला, पण त्याचवेळी ऑफसाईडचा इशारा झाला. रिप्लेमध्ये हा निर्णय अचूक असल्याचे दिसून आले, पण तोपर्यंत गोव्याच्या बेंचवरील खेळाडूंनी जल्लोष सुरु केला होता.
दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला बार्थोलोम्यू ओगबेचे प्रयत्न करणार तोच ऑफसाईडचा इशारा झाला.
निकाल:
एफसी गोवा: 5 (फेरॅन कोरोमीनास 59, 84, एदू बेदीया 69, ह्युगो बौमौस 71, मिग्युएल फर्नांडेझ 90+1)
विजयी विरुद्ध नॉर्थइस्ट युनायटेड एफसी: 1 (बार्थोलोम्यू ओगबेचे 90)
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का