आजपासून इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम सुरू होणार आहे. अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सलामीचा सामना खेळला जाणार आहे. कोव्हिड-19 साथीच्या रोगामुळे यावर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) आयपीएलचे आयोजन होणार आहे.
सामन्याच्या एक दिवस आधी, सीएसकेचे तीन दिग्गज खेळाडू क्वारंटाइन कालावधी संपवून मैदानात परतले आहेत. दिग्गज फिरकीपटू इमरान ताहिर,न्यूझीलंडचा फिरकीपटू मिशेल सँटनर आणि अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हे तिघेही कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) खेळल्यानंतर युएईमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर तिघेही क्वारंटाईन होते. आता त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून ते पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
मुंबई इंडियन्स संघ मागील हंगामातील चॅम्पियन असून सीएसके संघ उपविजेता होता. त्यामुळे परंपरेनुसार या दोन संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी सीएसकेचे ३ खेळाडू क्वारंटाईनमधून बाहेर आल्याने सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी कमी झाली आहे.
पण सीएसकेच्या सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणामुळे हंगामातून माघार घेतली आहे. तर कोव्हिड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ऋतुराज गायकवाड सलामीच्या समन्यात उपस्थित नसेल.
अशा परिस्थितीत या तिन्ही क्रिकेटपटूंची उपस्थिती म्हणजे सीएसकेसाठी आनंदाची बातमी आहे. सीएसकेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या तिघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात तिघेही हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
सीएसके संघ:
एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसी, इमरान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एंगेडी, मिशेल सँटनर, मोनू कुमार, मुरली विजय , रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम करन, पियुष चावला, जोश हेजलवुड, आर साई किशोर.