भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेटने पराभव केला होता. भारताच्या या खराब कामगिरी बद्दल क्रिकेट पंडितांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार सलामीवीर रोहित शर्मा आपला १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपवून ३० डिसेंबर रोजी भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे.
पहिल्या कसोटीत सुरुवातीचे दोन दिवस सामन्यात आघाडीवर असून देखील भारतीय संघाचा झालेला पराभव निश्चितपणे सर्वांना विसरणे अवघड जात आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा दुसरा डाव केवळ ३६ धावांवर संपुष्टात आला होता. भारताच्या या पराभवाबद्दल क्रिकेट पंडित सलामीवीर पृथ्वी शॉ व मयंक अग्रवाल यांच्या खराब कामगिरीला जबाबदार धरत आहेत. अशा परिस्थितीत अनेकांचे लक्ष रोहित शर्माच्या भारतीय संघातील पुनरागमनावर लागले आहे. रोहित सध्या ऑस्ट्रेलिया येथील सिडनी शहरात आपला १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपवत आहे.
सिडनीत वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या –
सिडनीत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे ७ जानेवारी रोजी होणारा सिडनी येथील सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात यावा अशी चर्चा सुरू आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. जर सिडनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर मेलबर्न येथेच तिसरा कसोटी सामना देखील खेळविण्यात येईल.
एका रिपोर्टनुसार बीसीसीआयने रोहितला मेलबर्न येथे आपला क्वारंटाइन कालावधी संपवण्याची मागणी केली होती ,पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मागणीचा अस्विकार करत रोहितला सिडनी येथेच थांबणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले.
बीसीसीआय ठेवते आहे रोहितच्या फिटनेसवर नजर –
रोहित सध्या सिडनी येथील एका 2BHK फ्लॅटमध्ये आपला १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपवत आहे. यादरम्यान रोहितला फ्लॅटमध्ये वर्कआउट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम रोहित सोबत सातत्याने चर्चा करत आहे. यादरम्यान रोहितला आपल्या शारीरिक फिटनेस सोबतच मानसिक स्थिती देखील योग्य ठेवणे गरजेचे आहे.
रोहित ७ जानेवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून खेळेल अशी सर्वांना आशा आहे. विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये रोहित सलामीवीर म्हणून कशाप्रकारे कामगिरी करतो याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
ऑस्ट्रेलियाला धक्का! वॉर्नरसह ‘हा’ खेळाडू देखील भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार
स्टिव्ह स्मिथला पुन्हा कर्णधार करणार का? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले ‘हे’ उत्तर