भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच बॉर्डर- गावसकर मालिका पार पडली आहे. भारताने या मालिकेत उत्तम कामगिरी करत 2-1 ने विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेतील शेवटच्या सामन्यात आपले पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी सोबतच फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे. अशातच मालिका संपल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत सलामीवीर असल्याने मदत झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुंदर म्हणाला, ” निश्चितच हे सत्य आहे की मला ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करताना सुरुवातीच्या काळात सलामीवीर असल्याने मदत झाली. जेव्हा ऑस्ट्रेलियाने नवीन चेंडू घेतला तेव्हादेखील मला स्वतःवर विश्वास होता. माझा विश्वास आणि माझी क्षमता यांच्या मिश्रणामुळे मला यश मिळाले. मला आनंद होत आहे की मी ऑस्ट्रेलियामध्ये धावा बनवू शकलो. मी ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटला.”
सुंदरने ब्रिस्बेन येथे आपले कसोटी पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 3 प्रमुख फलंदाजांना बाद केले तसेच, भारताच्या पहिल्या डावात शानदार 62 धावांची खेळी देखील केली. सुंदरने शार्दुल ठाकुर सोबत सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही सुंदरने एक बळी मिळविला होता. सुंदरचे विशेष कौतुक झाले ते भारताच्या दुसऱ्या डावातील त्याच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीने. भारताच्या दुसऱ्या डावात अतिशय महत्त्वाच्या क्षणी सुंदरने 22 धावांची खेळी करत संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ
गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…
रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण





